ताडोबाच्या पर्यटनाला लागले कोरोनाचे आर्थिक ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:00 AM2020-08-05T05:00:00+5:302020-08-05T05:00:23+5:30

राजकुमार चुनारकर। लोकमत न्यूज नेटवर्क चिमूर : एप्रिल, मे महिन्यात पर्यटकांनी फुलून जाणारा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यावर्षी मात्र ...

Tadoba's tourism took a financial toll on Corona | ताडोबाच्या पर्यटनाला लागले कोरोनाचे आर्थिक ग्रहण

ताडोबाच्या पर्यटनाला लागले कोरोनाचे आर्थिक ग्रहण

Next
ठळक मुद्देताडोबा व्यवस्थापनाला फटका : रिसॉर्ट व्यवसाय,गाईड, जिप्सी चालकही चिंतेत

राजकुमार चुनारकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : एप्रिल, मे महिन्यात पर्यटकांनी फुलून जाणारा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यावर्षी मात्र पर्यटकांविना ओस पडला आहे. त्यामुळे रिसॉर्ट व्यावसायिक, गाईड, जिप्सी चालक, छोटे मोठ्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला असून त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. सोबतच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनालाही महिन्याकाठी मोठा फटका सहन करावा लागत आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प देशासह राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. हमखास वाघाच्या दर्शनाने ताडोबा परिसर पर्यटकांना नेहमीच खुणावतो. दररोज शेकडो पर्यटक ताडोबाला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्यासह वाघाच्या वेगवेगळ्या छटांचा आनंद लुटतात. सोबतच या प्रकल्पाशेजारी रामदेगी देवस्थान, मुक्ताई धबधबा, चिमूर बालाजी मंदिर आदी प्रमुख पर्यटन आहेत. एप्रिल, मे महिन्यात तर ताडोबात पर्यटकांची संख्या दुपटीने वाढते. यंदा मात्र हे चित्र बदलले आहे. ताडोबा परिसर पर्यटकांविना ओस पडला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथील ताडोबा व्यवस्थापनाने येथील पर्यटन मार्च महिन्यापासून बंद ठेवले होते. शिवाय आता पावसाळाही सुरू झाल्याने येथील कोअर झोनमधील पर्यटन सप्टेंबर महिन्यापर्यत बंद आहे. त्यामुळे ताडोबातील कोअर झोनमधील पर्यटन सहा महिने बंदच राहणार आहे. दरम्यान, वन विभागाने ताडोबातील बफर झोन क्षेत्रात जुलै महिन्यापासून परवानगी दिली आहे. मात्र जिल्हाबंदीमुळे पर्यटकांची संख्या रोडावली आहे.

लॉकडाऊनपूर्वी पाच महिन्यांत ११३९ पर्यटकांची सफारी
वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबामध्ये पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता अनेकांना प्रवेश मिळत नव्हता. यामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड होत होता. ताडोबा व्यवस्थापनाने बफर झोनमध्ये पर्यटकांना सफारीची व्यवस्था केली. त्यामुळे बफर झोनमध्येही पर्यटक भेट देऊन सफारीचा आनंद घेत आहे. यामधूनही वन विभागाला चांगलाच महसूल मिळतो. चिमूर तालुक्यातील खडसंगी बफर वन क्षेत्रात अलिझनजा व नवेगाव गेटचा समावेश आहे. यात मागच्या मार्च महिन्यात निमढेला गेटची भर पडली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी ऑक्टोबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या पाच महिन्यात अलिझनजा व नवेगाव बफ्फर क्षेत्रात एकूण ११३९ पर्यटकांनी २३२ जिप्सी वाहनातून सफारी केली.यातून वनविभाला पाच महिन्यात ५ लाख ३९ हजार ३५० रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता.

जुलै महिन्यात ४३६ पर्यटकांनी केली सफारी
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने मार्च महिन्यापासून पर्यटन बंद केले. त्यामुळे पर्यटक वाघाच्या दर्शनाला मुकले होते. मात्र अनलॉक सुरू झाल्याने शासनाने जुलै महिन्यापासून ताडोबातील बफर झोनमध्ये पर्यटन सुरू केले. यामध्ये खडसंगी वनपरिक्षेत्र (बफर) अंतर्गत येणाऱ्या नवेगाव गेट, अलिझनजा गेट व निमढेला या तीन बफर झोन गेटचा समावेश आहे. या गेटमधून जुलै महिन्यात ४३६ पर्यटकांनी ९४ जिप्सी वाहनातून सफारी केली. यामधून प्रवेश शुल्क, कॅमेरा शुल्क असा एकूण १ लाख २ हजार ४५० रुपयांचा महसूल जमा झाला. मागच्या वर्षीच्या तुलनेत हा महसूल अत्यल्प आहे.

गाईड व जिप्सी चालकांचे अर्थचक्र लॉकडाऊनच
चिमूर तालुक्यात ताडोबात पर्यटकांना प्रवेश करण्यासाठी दोन कोअरचे तर पाच बफरचे प्रवेशद्वार आहेत. त्यामुळे तालुक्यात पर्यटन विकासाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. यामध्ये रिसॉर्ट चालक, रिसॉर्टमध्ये काम करणारे कामगार, गाईड, जिप्सी मालक, चालक यांच्यासह छोटे-मोठे व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून ताडोबातील सफारी बंद असल्याने पर्यटनावर अवलंबून असलेल्यांचे अर्थचक्र लॉकडाऊन झाले आहे. जुलैपासून बफर झोन क्षेत्रात पर्यटन सुरू केले असले तरी जिल्हा बंदी असल्याने बाहेरील जिल्ह्यातील पर्यटक येऊ शकत नाही. त्यामुळे बफर पर्यटन सुरु असले तरी जिल्हाबंदीने नसल्यासारखेच आहे. त्यामुळे गाईड व जिप्सी चालक आर्थिक कोंडीत सापडले आहे.

मार्च महिन्यापासून ताडोबातील पर्यटन बंद आहे. त्यामुळे पर्यटक येत नसल्याने गाईड, जिप्सी चालकांना मागील चार महिन्यांपासून रोजगार नाही. त्यामुळे परिवाराच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- रामराव नेवारे, गाईड,
ताडोबा नवेगाव गेट, चिमूर

Web Title: Tadoba's tourism took a financial toll on Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.