नागभीड तालुक्यात युरियासाठी टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:31 AM2021-08-22T04:31:00+5:302021-08-22T04:31:00+5:30
नागभीड : नागभीड तालुक्यात युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईने शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही ठिकाणी बेभाव ...
नागभीड : नागभीड तालुक्यात युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईने शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही ठिकाणी बेभाव दराने विक्री होत असल्याचा आरोप आहे. माहितीनुसार नागभीड येथे युरिया पोहचायला आणखी चार ते पाच दिवस लागतील, असा अंदाज आहे.
नागभीड तालुक्यास वार्षिक एक हजार ६०० टन युरियाची गरज आहे. मात्र कधीच आवश्यकतेनुसार युरिया प्राप्त झाला नाही. परिणामी तालुक्यात युरियाची दरवर्षीच टंचाई निर्माण होत असते. सद्य:स्थितीत भारी व हलक्या धान पिकाला युरिया खताची नितांत आवश्यकता आहे. मात्र नेमक्या याचवेळी नागभीड तालुक्यात युरियाची टंंचाई निर्माण झाली आहे.
नागभीड तालुक्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास २५ हजार हेक्टर क्षेत्रात हे पीक घेण्यात येते. यापैकी २० हजार हेक्टरमध्ये रोवणी तर ५ हजार हेक्टरमध्ये आवत्या असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. धान या पिकास यावेळी युरिया या खताची अत्यंत आवश्यकता असते. मात्र नेमक्या याचवेळी बाजारात युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकरी युरिया हे खत खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रात जात असले तरी कृषी केंद्र संचालकांकडे युरिया उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत यावे लागत आहे. माहितीनुसार नागभीड तालुक्यात सहा होलसेल विक्रेते आहेत. या ठोक विक्रेत्यांकडून छोट्या विक्रेत्यांना वितरण करण्यात येते.
बॉक्स
चढ्या भावाने विक्री
काही कृषी केंद्र संचालकांकडे युरिया उपलब्ध असून हे कृषी केंद्र संचालक शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने युरियाची विक्री करीत असल्याची माहिती आहे. मात्र तालुक्यातील कोणत्याही अधिकाऱ्याचे याकडे लक्ष नाही.
बॉक्स
दरवर्षी हीच परिस्थिती
दरवर्षीच्या हंगामाचा विचार केला तर नेमक्या याच परिस्थितीत दरवर्षी युरिया खताची टंचाई निर्माण होत असते. ही टंचाई नेमक्या याच वेळी का निर्माण होते, याची कारणमिमांसा संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांनी करणे जरुरीचे आहे. या कालावधीत धान पिकाला युरियाचे डोस मिळाले नाही तर त्याचा उत्पादनावर परिणाम होतो, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, तालुक्यात दोन-तीन दिवसांत युरिया प्राप्त होईल, असे नागभीडचे कृषी अधिकारी नितीन ऊईके यांनी सांगितले.