दहावी व बारावी परीक्षा सकाळ पाळीत घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:27 AM2021-03-08T04:27:06+5:302021-03-08T04:27:06+5:30
भद्रावती : कोरोनामुळे यावर्षी शैक्षणिक वर्षाला बरीच उशिरा सुरुवात झाली आणि त्याचमुळे दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा एप्रिल आणि ...
भद्रावती : कोरोनामुळे यावर्षी शैक्षणिक वर्षाला बरीच उशिरा सुरुवात झाली आणि त्याचमुळे दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात घेण्याचा शिक्षण विभागाने निर्णय जाहीर केला. मात्र मे महिन्यात ४७ अंश तापमान असणाऱ्या विदर्भात परीक्षा घेण्यास अनेक पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी विरोध दर्शविला असून सकाळी ८ ते ११ वाजता ही परीक्षा सकाळ पाळीत घेण्याची विनंती आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
मुलांच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा शैक्षणिक टप्पा म्हणजे दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा आहे. कोरोनामुळे यावर्षी मुलांचे निम्मे शैक्षणिक वर्ष वाया गेले आणि आता कुठे अभ्यासाची गाडी रुळावर यायला सुरुवात झाली आहे. त्यातच काल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर केली आणि तिकडे विदर्भातील पालकांना घाम फुटला आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्याप्रमाणे बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १ ते २२ एप्रिल आणि लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मेपर्यंत घेण्यात येणार आहे. तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा ९ ते २८ एप्रिल आणि लेखी परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मेपर्यंत घेण्यात येईल. विदर्भात या दरम्यान दररोजचे तापमान ४५ ते ४७ अंशांच्या घरात असते. मग अशा लाही-लाही करणाऱ्या गरमीत विद्यार्थी परीक्षा देणार तरी असे, असा प्रश्न पडला आहे.