दोषी डॉक्टरांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:26 PM2019-05-22T23:26:31+5:302019-05-22T23:27:45+5:30
डॉक्टरांच्या चुकीमुळे प्रसुतीनंतर बाळासह मातेचा मृत्यू झाल्याची घटना जिल्हा सामान्य रूग्णालयात घडली. या घटनेची चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेडने दिलेल्या निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : डॉक्टरांच्या चुकीमुळे प्रसुतीनंतर बाळासह मातेचा मृत्यू झाल्याची घटना जिल्हा सामान्य रूग्णालयात घडली. या घटनेची चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेडने दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यंग चांदा ब्रिगेडच्या एका शिष्टमंडळाने याप्रकरणी रूग्णालयात जाऊन प्रत्यक्ष डॉक्टरांशी चर्चा केली असता उपचारावेळी झालेला निष्काळजीपणाच पुढे आल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. विठ्ठल मंदिर वॉर्ड येथील शारदा येलमुले असे मृतक मातेचे नाव आहे. आकाश येलमुले हे पत्नी शारदा येलमुले हिला ७ मे रोजी वैद्यकीय महाविद्यालयात प्रसुतीसाठी भरती केली होते.
त्यानंतर १० मे रोजी त्यांना मुलगा झाला. त्यामुळे कुटुंबात आनंद असताना बाळाची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे डॉक्टरांनी तपासणीकरिता बोलावून बाळाला मृत घोषित केले. जन्मल्यानंतर १५ मिनिटामध्ये बाळ दगावल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. प्रसुती झाल्यावर अतिरक्तस्त्राव सुरू असल्याने मातेलाही वैद्यकीय महाविद्यालयात भरती ठेवण्यात आले. दरम्यान मातेकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे रक्तस्त्राव वाढला. शारदा येलमुले हिचा १८ मे रोजी पहाटे मृत्यू झाला. तिच्यावर उपचार सुरू असताना प्रकृती खालावली. मात्र, याबाबत डॉक्टरांनी नातेवाईकांना माहिती दिली नाही. याउलट डॉक्टरांना विचारणा करण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांशीच कर्मचाऱ्यांनी अरेरावी केली, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. वरिष्ठांनी चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली.