तळीराम कर्मचारी व शिक्षकांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:25 AM2021-03-07T04:25:40+5:302021-03-07T04:25:40+5:30
सिंदेवाही : तालुक्यातील विविध शासकीय विभागातील काही पर्यवेक्षकीय ...
सिंदेवाही :
तालुक्यातील विविध शासकीय विभागातील काही पर्यवेक्षकीय अधिकारी, शिक्षक व इतर कर्मचारी मंडळी कार्यालयीन वा शालेय कर्तव्यावर असताना चक्क मद्यप्राशन करून सामान्य नागरिक व पालकांना पहायला मिळत आहे. या प्रकाराची चौकशी करून अशा दोषींवर कारवाई करण्याची मागणी बसपा महिला आघाडीने केली आहे.
एकीकडे चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी कायदा लागू आहे आणि त्यातल्या त्यात कोणत्याही शासकीय कर्मचारी वा अधिकारी यास कर्तव्यावर असताना कोणत्याही प्रकारचे मादक द्रव्य, खर्रा वा मांसाहार पार्टी कार्यालय वा शाळेत करणे नियमबाह्य करण्यात आले आहे. असे असतानाही अनेक कर्मचारी कार्यालयात तर शिक्षक शाळेमध्ये मद्य प्राशन करून येत असल्याचे दिसते. यामुळे संबंधित कार्यालयातील वा शाळेतील महिला कर्मचारी, पालक तसेच शासकीय कामासाठी कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा कार्यालयीन वेळेत मद्य प्राशन करून येणाऱ्या मुजोर तळीराम कर्मचारी -अधिकारी व शिक्षकांवर थेट निलंबनाची कारवाई करून मुसक्या आवळाव्या, असी मागणी बहुजन समाज पार्टी सिंदेवाहीच्या महिला आघाडी प्रमुख शीतल शेंडे यांनी केलेली आहे.