गुंडांवर कारवाई करु-अहीर
By admin | Published: July 13, 2015 01:05 AM2015-07-13T01:05:55+5:302015-07-13T01:05:55+5:30
राजुरा येथील भारतीय जनता पक्षाचे राजुरा शहर अध्यक्ष तथा पत्रकार बादल बेले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला.
पत्रकारांनी दिले निवेदन : पाच तालुक्यातील पत्रकारांचा पुढाकार
राजुरा : राजुरा येथील भारतीय जनता पक्षाचे राजुरा शहर अध्यक्ष तथा पत्रकार बादल बेले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या घटनेनंतर रविवारी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे यांनी बादल बेले यांच्या घरी जाऊन विचारपूस केली. यानंतर शासकीय विश्रामगृहामध्ये एक तास राजुरा येथील पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. जीवघेणा हल्ला करणाऱ्या आणि राजुरा शहरात गुंडागर्दी करणाऱ्यांची गय करू नका, कायदा व सुव्यवस्था योग्य रितीने पाळा अन्यथा पोलिसांनासुद्धा कारवाईला पुढे जावे लागेल, अशी ताकीद ना. हंसराज अहीर यांनी दिली.
राजुरा येथील विश्रामगृहात राजुरा, बल्लारपूर, कोरपना, जिवती, गोंडपिपरी तालुक्यातील पत्रकार यावेळी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत ना. हंसराज अहीर, आ. अॅड. संजय धोटे यांना पत्रकारांनी निवेदन दिले. बादल बेले, प्रकाश खडसे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आणि पोलिसांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. यासोबत पत्रकार हक्क कायदा व संरक्षणबाबत कायदा बनविण्याची मागणी केली. यावेळी पत्रकार राघवेंद्रराव देशकर, आनंद भेंडे, प्रा. बी.यू. बोर्डेवार, महीयर गुंडेविया, अनिलबाळ सराफ, एम.के. शेलोटे, चरणदास नगराळे, प्रा. राजेंद्र मोरे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)