आजारांवर उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:52 PM2018-09-18T22:52:27+5:302018-09-18T22:53:02+5:30
जिल्ह्यामध्ये विविध इस्पितळात व सरकारी रुग्णालयांमध्ये मलेरिया, डेंग्यू व अन्य किटकजन्य आजार वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेला सोबत घेऊन आजारावर नियंत्रण मिळविणारी मोहीम तातडीने सुरू करण्याचे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वने तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये विविध इस्पितळात व सरकारी रुग्णालयांमध्ये मलेरिया, डेंग्यू व अन्य किटकजन्य आजार वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेला सोबत घेऊन आजारावर नियंत्रण मिळविणारी मोहीम तातडीने सुरू करण्याचे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वने तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्ह्यामध्ये किटकजन्य आजार वाढत आहेत. काही व्यक्तींना डेंग्यू सदृश्य आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय हिवताप लागण झालेल्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे अधिकाºयांनी ग्रामीण व शहरी भागांमध्ये उपाययोजना आखाव्यात, असेही ना. मुनगंटीवार सांगितले. विविध आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि विविध आरोग्य योजनांची माहिती ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करून अमलबजवणी करण्याचे निर्देशही ना.मुनगंटीवार यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक
जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेऊन किटकजन्य आजाराबाबत सद्यस्थिती जाणून घेतली. पावसाळा संपण्यापूर्वी जिल्ह्यामध्ये मलेरिया, डेंग्यू आणि स्क्रब टायपस या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णला औषधोपचार मिळाला पाहिजे, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साठे, जिल्हा हिवताप हत्तीरोग अधिकारी डॉ.अनिल कुकडपवार, मनपा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आंबटकर, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, पालकमंत्र्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय इंगोले व अन्य अधिकारी उपस्थित होते.