स्पर्धा परीक्षांसाठी आव्हान मोठे घ्या व यशस्वी व्हा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 06:00 AM2020-01-03T06:00:00+5:302020-01-03T06:00:24+5:30
या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना निसर्गाने दिलेल्या नैसर्गिक देणगीचा सन्मान करावा, असा संदेश दिला. आपण कोण, कसे आहोत, कुठून आलोय, कसे दिसतो, काय कमी आहे, याचा कोणताही न्यूनगंड न बाळगता केवळ आपल्या बुद्धिचातुर्याने स्पर्धा परीक्षा यशस्वी करता येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, प्रत्येकाने यशाचे सांगितलेले सूत्र, शिखर गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची यश कथा, उपस्थितांमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मिळालेली थेट उत्तरे, यामुळे मिशन सेवा अंतर्गत जिल्हा प्रशासन, दीपस्तंभ फाउंडेशन, अरूण बोंगीरवार फाऊंडेशन यांच्यामार्फत इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात गुरुवारी आयोजित स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन सेमिनारला चंद्रपूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यशाळेला अरुण बोंगीरवार यांच्या पत्नी लता बोंगीरवार, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जेष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी, छत्तीसगड येथील महिला व बालकल्याण विभागाचे सचिव सिद्धार्थ परदेशी, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना निसर्गाने दिलेल्या नैसर्गिक देणगीचा सन्मान करावा, असा संदेश दिला. आपण कोण, कसे आहोत, कुठून आलोय, कसे दिसतो, काय कमी आहे, याचा कोणताही न्यूनगंड न बाळगता केवळ आपल्या बुद्धिचातुर्याने स्पर्धा परीक्षा यशस्वी करता येते. हा आत्मविश्वास मनात बाळगणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. युपीएससीसारखे मोठे आव्हान घेण्याचे एकदा निश्चित झाले की मग अन्य आव्हाने छोटी वाटतात. त्यामुळे स्वत:ला पूर्णत: ओळखून मोठे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावे. त्यामुळे वैयक्तिक क्षमता वृत्तीत वाढ होते, असे त्यांनी सांगितले.छत्तीसगड प्रशासनात सचिव म्हणून काम करणारे सिद्धार्थ परदेशी यांनी यावेळी आवडीनुसार कार्यक्षेत्र निवडण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तुमचा आत्मविश्वास व तुम्ही निवडलेले क्षेत्र तुम्हाला यश मिळवून देते. त्यामुळे सकारात्मक विचार करण्याची सवय ठेवावी. अशा विचारांचीच आजूबाजूला गर्दी असावी, आणि दर्जेदार अभ्यासाची गोडी लावून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या संबोधनात सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यजुवेंद्र महाजन यांनी केले. यावेळी मिशन सेवा अंतर्गत जिल्ह्यातील प्रमुख अभ्यासिकाना पुस्तकांच्या संचाचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील विविध स्पर्धा परीक्षा अकादमी तसेच जिल्हाभरातील स्पर्धा परीक्षक इच्छुक विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
स्वत:शी स्पर्धा करा- कुणाल खेमनार
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉक्टर, इंजिनियर व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आयएएस बनण्यासाठी प्रयत्न का करतात, हे कोडे सोडवून दाखविले. ते म्हणाले, सामाजिक भान आणि वैविध्यपूर्ण व आव्हानात्मक करियर निवडायची आवड, तशी वृत्ती व ती धडपड असणाºया प्रत्येकाला सनदी अधिकारी बनण्याची तळमळ असते. त्यामुळे गुणवान, मात्र आव्हान स्वीकारण्याची ताकद असणारे या क्षेत्रात येत असतात. यावेळी त्यांनी आयएएस होताना आलेल्या अडचणी व त्यावर त्यांनी केलेली मात, याबाबतचे मार्गदर्शन केले.
परिस्थितीचा बाऊ करू नका-राहुल कर्डिले
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी आयएएस होण्यासाठी आपल्या गरीब परिस्थितीचा बाऊ न करता मोठ्या शहरात राहण्याची व अभ्यासाची व्यवस्था व्हावी, यासाठी वेगवेगळ्या परीक्षा देऊन शासनामार्फत सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षांच्या सोयींचा कसा उपयोग करून घेतला, याची धडपड विद्यार्थ्यांपुढे मांडली. दहा बाय दहाच्या रूममध्ये दहा-बारा लोकांनी अभ्यास केल्यानंतर देखील त्या रूममधून दोन आयएएस अधिकारी कसे तयार झालेत, याचा रोमहर्षक प्रवास मांडला. यशदा व अन्य ठिकाणी मिळणारे प्रशिक्षण व त्यासाठी पुणे, मुंबई, कोल्हापूर असा केलेला प्रवास विद्यार्थ्यांना थक्क करून गेला.