चिमूर गटशिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभार काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:33 AM2021-07-14T04:33:23+5:302021-07-14T04:33:23+5:30
-प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार काढा पुरोगामी शिक्षक समितीची निवेदनातून मागणी पुरोगामी शिक्षक समितीची मागणी चिमूर : चिमूर पंचायत समिती अंतर्गत ...
-प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार काढा
पुरोगामी शिक्षक समितीची निवेदनातून मागणी
पुरोगामी शिक्षक समितीची मागणी
चिमूर : चिमूर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत जिल्हा परिषद शिक्षकांचे उशिरा होणारे वेतन ही नित्याची बाब झाली आहे. या त्रासाला कंटाळून महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती तालुका शाखेने पंचायत समिती चिमूरचे गट शिक्षणाधिकारी यांच्या पदाचा प्रभार काढावा, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने निवेदनही दिले आहे.
मागील अनेक वर्षांपासून चिमूर पंचायत समितीत शिक्षण विभागाचा कारभार प्रभारी गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. काही महिन्यांपूर्वी एका प्रभारी गशिआकडून पदभार काढून दुसऱ्या प्रभारी विस्तार अधिकाऱ्यांच्याकडे दिला आहे. त्यांचा अधीनस्त कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने शिक्षण विभागात सावळागोंधळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
डीसीपीएस शिक्षकांच्या जमा रकमेचा घोळ, शिक्षकांचे देयके गहाळ होणे, विभागातील लिपिकांवर कोणतेही नियंत्रण नसणे, सेवापुस्तके अद्ययावत नसणे, वेतनातील विविध कपातीचा घोळ, शिक्षकांचे वेतनाचे खाते परस्पर बदल करणे, सोसायटीचे डीडी वेळेत न मिळणे, दर महिन्याला रक्कम प्राप्त झाल्यानंतरही आठ दहा दिवस उशिरा वेतन अदा होणे यासह अनेक समस्या प्रलंबित आहे. संघटनेमार्फत वारंवार पत्रव्यवहार करूनही समस्या सुटू शकल्या नाही. विशेष म्हणजे, नव्याने पदभार स्वीकारणाऱ्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी समस्या निवारण सभा घेतली मात्र कोणत्याही सामूहिक समस्या निकाली काढलेल्या नाही. विभागप्रमुख या नात्याने शिक्षकांच्या समस्या सोडविणे ही गटशिक्षणाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या पदाचा प्रभार काढावा, अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेने निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात नरेंद्र मुंगले, रवी वरखेडे, ताराचंद दडमल, सलीम तुरके, राजू चांदेकर, शकील कुरेशी, मुरलीधर नन्नावरे, गोवर्धन ढोक व गोविंद गोहणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
130721\img-20210713-wa0003.jpg
मुख्यकार्यपालन अधिकारी यांना बिडीओ मार्फत निवेदन देताना पुरोगामी शिक्षक समितीचे पदाधिकारी