‘त्या’ कंत्राटदारावर कारवाई करून काळ्या यादीत टाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:47 PM2018-07-17T22:47:44+5:302018-07-17T22:48:22+5:30
पहिल्याच पावसामुळे चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने लोकांना जीव गमवावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पहिल्याच पावसामुळे चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने लोकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे या अपघातासाठी संबंधित कंत्राटदारांना दोषी ठरवून कारवाई करावी आणि त्यांना काळ्या यादीत टाकून कामे नाकारावीत, असे निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. स्थानिक शासकीय विश्रामगृहात मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.
राजुरा लक्कडकोट तसेच गडचांदूर-कोरपना मार्ग केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) अंतर्गत बांधलेल्या रस्त्यांची पहिल्याच पावसामुळे दुरवस्था झाली. हे रस्ते वाहतुकीयोग्य नसून अपघातांच्या संख्येमध्ये कमालीची वाढ झाली. अपघात टाळण्याकरिता या रस्त्यांची सुधारणा करण्याच्या सूचना ना. अहीर यांनी अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्याला केल्या. राजुरा-लक्कडकोट मार्गाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबद्दल तक्रारी आल्या होत्या. पण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपअभियंत्यांनी याकडे दुर्लक्ष केले हा प्रकार गंभीर असल्याचेही असेही ते म्हणाले. गडचांदूर येथील बसस्थानकासमोरील रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार नागरिकांनी केली. या बांधकामाची चौैकशी करून संबंधित कंत्राटदारांना कारवाई करावी. राजुरा व बाबुपेठ येथील रेल्वे ओवरब्रिज कामाचाही या बैठक आढावा घेतला. या कामाची गती वाढविण्याच्या सुचनाही बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना दिल्या. यावेळी महापौर अंजली घाटेकर, विजय राऊत, खुशाल बोंडे, राहुले सराफ आदी उपस्थित होते.
आदिवासी वसतिगृह हस्तांतरित होणार
राजुरा व चंदनखेडा येथे आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण झाले असल्याने हे दोन्ही वसतिगृह संबंधित विभागाकडे हस्तांतरीत करण्याची कार्यवाही करावी. नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना या वसतिगृहाचा उपयोग घेता येईल. केवळ उद्घाटनाचे औचित्य पुढे करून विद्यार्थी प्रवेश प्रलंबित ठेवू नये, अशा सुचनाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या. राजुरा येथील रूग्णालयाच्या बांधकामासाठी पाच कोटींचे वाढीव अंदाजपत्रक अनावश्यक असल्याचे स्पष्ट करून बांधकाम पूर्णावस्थेत आल्याने उर्वरीत बांधकाम अल्प खर्चात करावे. ही इमारत आरोग्य विभागाला अविलंब हस्तांतरीत करण्यात येईल, अशी ग्वाही ना. अहीर यांनी दिली.