रस्त्यावर उभ्या वाहनांवर तात्काळ कारवाई करा!
By admin | Published: April 13, 2017 12:44 AM2017-04-13T00:44:21+5:302017-04-13T00:44:21+5:30
उपरवाही येथील अंबुजा सिमेंट उद्योगासमोर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे दैनंदिन वाहतुकीस बाधा निर्माण होत आहे.
हंसराज अहीर यांचे निर्देश : अंबुजा सिमेंट उद्योगासमोरील परिसराची पाहणी
चंद्रपूर : उपरवाही येथील अंबुजा सिमेंट उद्योगासमोर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे दैनंदिन वाहतुकीस बाधा निर्माण होत आहे. येथे घडत असलेल्या अपघातामध्ये आजपर्यंत अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. वारंवार ताकीद देवूनही पोलिसांनी तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली नाही. याची तत्काळ दखल घेऊन पोलीस व आरटीने रस्त्यावर उभ्या वाहनांवर कारवाई करावी, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले आहे.
ना. अहीर यांनी अंबुजा सिमेंट उद्योगासमोरील परिसराची पाहणी करून वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या दोषी वाहनांवर व संबंधित वाहन चालकावर परवाना रद्द करण्याची कारवाई करावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या उद्योगासमोरील उभ्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सातत्याने सुचना देवूनही व याबाबत स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय तसेच नागरिकांकडून उद्योगासमोरील वाहने हटविण्यासंदर्भात अनेकदा निवेदने व तक्रारी दिल्यानंतरही पोलिसांनी या गंभीर प्रश्नाकडे डोळेझाक केली.
नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांना अभय देण्याचा प्रयत्न चालविल्याने अनेक लोकांना नाहक प्राण गमवावे लागले आहे. याची दखल घेवून आता अशा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दोषारोप ठेवून त्यांच्यावरही अनुशासनात्मक कारवाई पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी, असे निर्देश ना. हंसराज अहीर यांनी पोलीस व आरटीओच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)