डेंग्यू, मलेरिया आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:33 AM2021-08-25T04:33:00+5:302021-08-25T04:33:00+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया या साथींच्या रोगाचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे होणारे मृत्यू ही अतिशय चिंतेची बाब आहे. ...
चंद्रपूर : जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया या साथींच्या रोगाचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे होणारे मृत्यू ही अतिशय चिंतेची बाब आहे. हा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच सर्व नगरपालिकांच्या प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, प्रामुख्याने जनजागरण मोहीम म्हणून प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी आदींवर भर द्यावा. अतिरिक्त फॉगिंग मशीनची खरेदी करण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी खनिज विकास निधीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करावेत, असे मत विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
डेंग्यू, मलेरिया या साथींच्या आजारासंदर्भात उपाययोजना करण्याबाबत ऑनलाईन आढावा बैठक घेत लोकप्रतिनिधींशी संवाद साधला,यावेळी बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी, महापौर राखी कंचर्लावार, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत, उपमहापौर राहुल पावडे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, मुख्याधिकारी विजय सरनाईक, सिद्धार्थ मेश्राम, मुलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, उपनगराध्यक्ष नंदू रणदिवे आदींसह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती, नगरसेवकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्ह्यातील कोणतेही प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णवाहिकेशिवाय राहता कामा नये असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.