मेळाव्यातून जिंकण्याची मानसिकता घेऊन जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:04 PM2018-10-28T23:04:32+5:302018-10-28T23:05:59+5:30

नोकरी, रोजगार, स्वयंरोजगार, प्रशिक्षण, मार्गदर्शन व संधी उपलब्ध करणारी बल्लारपूरची युथ एम्पॉवरमेंट समीट ही रोजगारयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याची सुरुवात आहे. हा रोजगार महामेळावा आपल्याला जिंकण्याची मानसिकता देणार आहे. बल्लारपूरवरून ही मानसिकता घेऊन लढायला सिद्ध व्हा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Take the mentality to win the rally | मेळाव्यातून जिंकण्याची मानसिकता घेऊन जा

मेळाव्यातून जिंकण्याची मानसिकता घेऊन जा

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बामणीत युथ एम्पॉवरमेंट समिटचा शानदार शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नोकरी, रोजगार, स्वयंरोजगार, प्रशिक्षण, मार्गदर्शन व संधी उपलब्ध करणारी बल्लारपूरची युथ एम्पॉवरमेंट समीट ही रोजगारयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याची सुरुवात आहे. हा रोजगार महामेळावा आपल्याला जिंकण्याची मानसिकता देणार आहे. बल्लारपूरवरून ही मानसिकता घेऊन लढायला सिद्ध व्हा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
३८ हजार युवकांनी आॅनलाईन नोंदणी केलेल्या चंद्रपूर जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांच्या मेळाव्याला स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर तर उद्घाटक म्हणून कौशल्य विकासमंत्री संभाजीराव निलंगेकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी या नात्याने आ. नाना शामकुळे, आ. संजय धोटे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, फॉर्च्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष आ.अनिल सोले, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, उद्योजक श्रीकांत बडवे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युथ एम्पॉवरमेंट समिटमधील सहा सूत्रांची मांडणी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व युवकांना अगदी रेल्वे, सैन्यदल, खाण क्षेत्र व अन्य कोणत्याही क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्यासाठी संधी उपलब्ध व्हावी, यासाठी आवश्यक असणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची मार्गदर्शनाची उपलब्धता जिल्ह्यातील युवकांना आगामी काळात केली जाणार असून त्यामार्फत त्यांनाही संधी दिली जाणार आहे. जिल्ह्यातील युवकांचा सरकारी नोकरीमध्ये टक्का वाढविण्यासाठी ही मोहीम आम्ही हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा विकासाग्रणी होईल - हंसराज अहीर
चंद्रपूर जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार या क्षेत्रात अग्रेसर व्हावा, यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जो सहा सूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे, तो खरोखरच कौतुकास्पद आहे, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर अध्यक्षीय भाषणादरम्यान म्हणाले. या जिल्ह्यात सुरू असलेली विकासकामे, लोकोपयोगी उपक्रम यांच्या माध्यम तून जिल्ह्यातील जनतेची सेवा करण्याचे जे काम जिल्ह्यात पालकमंत्री करीत आहे. पंतप्रधानांची मुद्रा योजना चंद्रपूर जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली जात आहे. रोजगार, स्वयंरोजगार, उन्नत शेती, कौशल्य विकास, सोशल वर्क, फॉरेन सर्व्हिसेस असा हा सर्वस्पर्शी सहा सूत्री कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्याला विकासाग्रणी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
टाटा ट्रस्टच्या मदतीने आधुनिक शेती
आमचा परंपरागत उद्योग हा शेती होता. तरीही आता पारंपरिक पद्धतीने शेती करता येणार नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये टाटा ट्रस्टच्या मदतीने पाच हजार शेतकरी नव्या पद्धतीची शेती करण्यासाठी सिद्ध झाले आहेत. हा पथदर्शी प्रकल्प आहे. आगामी काळात नव्या तंत्रज्ञानाने शेती करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देण्याची संधी मिशन शेतीतून केली जाणार आहे, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
हा मेळावा मुनगंटीवारांवरील जनतेच्या विश्वासाचे द्योतक - निलंगेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कौशल्य विकासाची संकल्पना पुढे नेत राज्य शासनाने या विभागाच्या माध्यमातून अनेक उत्तम निर्णय घेतले असून त्यांची प्रभावी अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी रोजगार मेळावे मी बघितले आहे. पण उत्तम नियोजन व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला हा मेळावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जनतेच्या विश्वासाचे द्योतक आहे. केवळ एम्प्लॉयमेंटपर्यंत मर्यादित न राहता त्यांनी एम्पॉवरमेंटसाठी जो पुढाकार घेतला आहे, तो अभिनंदनीय आणि मार्गदर्शक असल्याचे कौशल्य विकास मंत्री निलंगेकर म्हणाले. चंद्रपूर आणि लातूर येथे मॉडेल आयटीआयसाठी १५ कोटी रु. ची तरतूद करून अर्थमंत्र्यांनी औद्योगिक प्रशिक्षणातून कौशल्य विकासाला चालना दिल्याचे ते म्हणाले. युवक युवतींनी या संधीचे सोने करावे, असे ना. निलंगेकर म्हणाले.
उद्याचे चंद्रपूर रोजगारयुक्त
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कौशल्य विकासावर खूप भर आहे. त्यामुळे प्रधानमंत्री यांनी स्टार्टअप, स्टॅड अप, मुद्रा आदी योजना सुरू केल्या आहेत. उद्याचे नवीन चंद्रपूर हे रोजगार युक्त असावे हे आपले स्वप्न असून यासाठी या सर्व योजनांचा उपयोग केला जाईल, अशी ग्वाही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
पहिल्याच दिवशी २७७८ युवकांना नोकऱ्या
चंद्रपूर : ३८ हजार नोंदणीकृत उमेदवारांपैकी पहिल्या दिवशी मुलाखत झालेल्या जवळपास २० हजार उमेदवारांपैकी २७७८ उमेदवारांना बल्लारपूरच्या रोजगार महामेळाव्यात नोकरी मिळाली आहे. निवड झालेली ही संख्या लक्षणीय असून एका मोठ्या आयोजनातून एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने युवकांना वेगवेगळ्या आस्थापनेवर काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले आहे.
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी मिळावी, यासाठी राज्यातील ५३ प्रतिष्ठित कंपन्यांना बल्लारपूर येथे आणण्यात आयोजकांना यश आले. विशेष म्हणजे, निवड झालेल्यापैकी ७४ व्यक्ती दिव्यांग आहे. या आयोजनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी गेल्या महिनाभरापासून केलेल्या अथक परिश्रमामुळे व आमदार अनिल सोले यांच्या फॉर्च्यून फाऊंडेशनने केलेल्या टेक्निकल सपोर्टमुळे पहिल्याच दिवशी आपल्या जिल्ह्यातील अडीच हजार विद्यार्थ्यांची निवड झाल्याचा आनंद असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार स्पष्ट केले आहे. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वातील या मोठ्या आयोजनात सुशिक्षित बेरोजगारांच्या हाती असंख्य नोकऱ्या पडतील, असे कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी वाटत होते. त्यामुळे पहिल्या दिवशीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या निवड प्रक्रियेतून अडीच हजारावर मुलांची निवड झाल्याबद्दल अतिशय आनंद वाटतोे, असे ना. निलंगेकर यांनी म्हटले आहे.
सोमवारी हजारो युवकांच्या होणार मुलाखती
नोंदणीकृत उमेदवारांनी एसएमएसप्रमाणेच यावे
बल्लारपूरमध्ये ७४ दिव्यांगांना मिळाली नोकरी
हजारो मुलांच्या शांततामय मुलाखतींचे कौशल्य विकास मंत्र्यांकडून कौतुक
पालकमंत्र्यांनी व्यक्त केला आनंद
उमेदवारांसाठी जेवणाची सोय
तत्काळ नियुक्तीपत्रामुळे उमेदवारांमध्ये आनंद

Web Title: Take the mentality to win the rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.