खासगी क्षेत्रातील नोकरभरती सेवायोजना पोर्टलद्वारे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 05:00 AM2020-06-16T05:00:00+5:302020-06-16T05:01:17+5:30
राज्यातील कुशल-अकुशल कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार जिल्हा सेवायोजना कार्यालयातंर्गत नोंदणी करून खासगी क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णय घेण्याची मागणी अखिल भारतीय गोंडवाना पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. धीरज शेडमाके यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. परराज्यातील मजूर आपआपल्या गावाला निघून गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला खासगी उद्योग क्षेत्रात विविध कामगारांची गरज भासणार आहे. त्यामध्ये कुशल तथा अकुशल कामगारांचा सहभाग हा मोठ्या संख्येने आहे. राज्यातील कुशल-अकुशल कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार जिल्हा सेवायोजना कार्यालयातंर्गत नोंदणी करून खासगी क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णय घेण्याची मागणी अखिल भारतीय गोंडवाना पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. धीरज शेडमाके यांनी केली आहे.
मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, नागपूर, सातारा यासारख्या औद्योगिक शहरातील तथा इतर शहरातील मोठ्या उद्योजकांची तथा मोठ्या कंपन्यांच्या कंपनीधारकांची राज्य सरकारने बैठक बोलावून त्यात किमान वेतन कायद्याच्या धर्तीवर, कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेसाठी चर्चा करावी, सेवायोजन कार्यालयाच्या माध्यमातून खासगी कंपन्यातील नोकरभरती केल्यास स्थानिक बेरोजगार तरुणांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. शिवाय महाराष्ट्र नव्याने उभा करण्यासाठी या युवकांची मोठी मदत मिळणार असून राज्यातील बेरोजगारीवरही मात करता येणे शक्य होणार असल्याने सरकारने यासाठी पुढाकार घेवून तसा शासननिर्णय घ्यावा, सेवायोजन कार्यालयात कुशल-अकुशल कामगारांची तथा सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी करण्यासाठी सेवायोजन कार्यालयातील ऑनलाइन नोंदणी शुल्क १०० रुपये सरसकट आकारण्यात यावे, नोंदणी शुल्कामुळे सरकारच्या तिजोरीत मोठा महसूल जमा होण्यास मदत होईल, कोविड-१९ मुळे महाराष्ट्र सरकार होरपळून निघाले असताना, राज्यातील जनता, सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, मजूर, मोठे-लहान व्यावसायिक, उद्योजक होरपळून निघाले आहेत. त्यामुळे सरकारने खासगी कंपन्यामध्ये पदभरतीसाठी पुढाकार घेतल्यास बेरोजगारीचा प्रश्न मिटेल, असा आशावाद व्यक्त केला आहे.