१५ दिवसांत सुरक्षा रक्षकांना कामावर घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:34 AM2017-10-14T01:34:36+5:302017-10-14T01:34:47+5:30
शिवसेनेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाºयानंतर वेकोलि प्रबंधनाने सर्व सुरक्षा रक्षकांना पूर्ववत कामावर घेण्याचे आश्वासन दिले होते...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शिवसेनेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाºयानंतर वेकोलि प्रबंधनाने सर्व सुरक्षा रक्षकांना पूर्ववत कामावर घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शब्द न पाळता वेकोलिने कामगारांचा विश्वासघात केला. वेकोलि प्रबंधकाची ही मुजोरी आता खपवून घेतली जाणार नाही. येत्या १५ दिवसाच्या आत सर्व सुरक्षा रक्षकांना कामागावर घ्यावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची पूर्ण जबाबदारी वेकोलि प्रबंधनाची राहील, असा इशारा शिवसेना विधानसभा प्रमुख किशोर जोरगेवार यांनी दिला आहे.
वेकोलिमध्ये कार्यरत सुरक्षा रक्षकांना पूर्ववत कामावर घ्या, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात सुरक्षा रक्षकांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात ते बोलत होते. ते म्हणाले, कोणतीही पूर्व सूचना न देता जुलै महिन्यात वेकोलि प्रबंधकाने जिल्ह्यातील १ हजार ते १२०० स्थानिक खासगी सुरक्षा रक्षकांना कामावरुन काढले. त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबावार मोठे संकट कोसळले आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊनसुद्धा वेकोलि प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही.
निवेदनाची भाषा वेकोलि प्रशासनाला समजत नसेल तर शिवसेनेच्या भाषेत उत्तर द्यायची आमची पूर्ण तयारी आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या बाबतीत घेतलेला अन्यायकारक निर्णय वेकोलिने तत्काळ रद्द करावा आणि सर्व कामगारांना पूर्ववत कामावर रूजू करून घेत न्याय द्यावा. ही सर्व प्रक्रिया येत्या १५ दिवसाच्या आत करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, किशोर जोरगेवार यांनी दिला आहे. या आंदोलनात नगरसेवक विशाल निंबाळकर, संगीता बोबडे, सायली येरणे, माया पटले, दुर्गा वैरागडे, सुजाता बल्ली, विद्या निब्रड, शांता धांडे, विजया बचाव, मुन्ना लोढे, बाळू चिकनकर, इमरान खान, स्वप्नील वाढई, विनोद अनंतवार, विलास बनकर, हर्षद कानमपल्लीवार, अशोक खडके, विनोद गरडवा, इशाक अली, सोनाल भगत आदींचा सहभाग होता.