पाच म्हणता दहा घ्या, पण कापूस वेचणीसाठी या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 06:00 AM2019-12-16T06:00:00+5:302019-12-16T06:00:22+5:30

जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली आहे. मागील दोन वर्षात बोंडअळीने शेतकऱ्यांना त्रस्त केले. यावर कशीबशी मात करीत नाही तोच यावर्षी ऑक्टोबर महिन्यातील सततचा पावसामुळे होत्याचे नव्हते झाले.

Take ten for five, but come for a cotton swab | पाच म्हणता दहा घ्या, पण कापूस वेचणीसाठी या

पाच म्हणता दहा घ्या, पण कापूस वेचणीसाठी या

Next
ठळक मुद्देउत्पादन नाही अन् भावही नाही : कापूस, सोयाबीन व धान उत्पादक सारेच आर्थिक संकटात, नव्या सरकारकडून अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : यावर्षी कापूस उत्पादनाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. शासकीय हमीभाव ५ हजार ५०० रुपये क्विंटल आहे. असे असताना खर्चाची रक्कम बघता यातून कोणताच फायदा शेतकऱ्यांना होत नसून आता तर वेचणीसाठी ५ ते ७ रुपये प्रति किलो दर द्यावे लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कापूस शेतातच पडून राहू नये म्हणून शेतकरी आता वेचणीसाठीही जादा दर देऊन मजुरांकडे साकडे घालत आहेत.
जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली आहे. मागील दोन वर्षात बोंडअळीने शेतकऱ्यांना त्रस्त केले. यावर कशीबशी मात करीत नाही तोच यावर्षी ऑक्टोबर महिन्यातील सततचा पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. वातावरणातील बदलामुळे कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात लाल्या रोग आला. त्यामुळे कपाशीची वाळण्याकडे वाटचाल सुरु आहे. दरम्यान, संपूर्ण कपाशी दोन-तीन वेच्यातच शेतकऱ्यांच्या घरात पोहोचली आहे. एकरी तीन ते चार क्विंटल उत्पादन होत आहे. कापूस वेचणीची मंजुरी ही ५ ते ७ रुपये प्रती किलोदराने मजुरांना द्यावी लागत आहे.
एकरी चार ते पाच क्विंटल कापूस घरी येत असून जेमतेम काही हजार शेतकऱ्यांच्या हातात मिळते. शेतकऱ्यांना आधीच बियाणे, पेरणी किटकनाशक, खत, डवरणी, निंदण यासाठी पैसे खर्च करावे लागते. त्यात कापूस वेचनासाठी मजुर मिळत नाही. कसेबसे मिळावे तर त्यांना ५ ते ७ रुपये पर्यंत प्रति किलो मजुरी द्यावी लागत आहे. शेतकऱ्यांना सहा महिन्याच्या परिश्रमात त्याच्या हाती खर्चा इतपतही पैसे येत नसल्यामुळे वर्षबर कुटुंबाचे पालन-पोषण कसे करायचे, असे प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. आधीच वाढलेले बँकेचे कर्ज, वेळेवरचे खर्च भागविण्यासाठी केलेला हातउसणवारी ती फेडण्यासाठी पुन्हा गावातील सावकारांचे कर्ज अशा विवंचनेत सध्या जिल्ह्यातील शेतकरी अडकला आहे.

पावसाचा उत्पादनावर फटका
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे संकटाचा सामना करावा लागला. अवकाळी पावसाने कपाशीची बोंडे सडल्याने उत्पादनात घट झाली आहे. तर दुसरीकडे सततच्या पावसाने कपाशीची प्रतवारी घसरल्याने बाजारभाव कमी अशी अवस्था झाली आहे. दरवर्षी साधारणत: दसऱ्यानंतर शेतकऱ्यांच्या घरी सोयाबिन व कापूस हे नगदी पीक येतात. दिवाळी आनंदात जाते. परंतु यंदा याच काळात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

अधिवेशनाकडे शेतकऱ्यांच्या नजरा
आता राज्यात सत्ता परिवर्तन झाले आहे. महाविकास आघाडीची सत्ता बसली आहे. नव्या सरकारकडून शेतकरी सरसकट कर्जमाफीसाठी आशावादी झाला आहे. विधानसभा निवडणूक प्रचारात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी संकटातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची ग्वाही जाहीरनाम्यात दिली होती. सोमवारपासून नागपुरात नव्या सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सातबारा कोरा करण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीची घोषणा कधी होते, याकडे मोठ्या आशेने शेतकरी नजरा लावून आहेत. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, यासाठी आग्रही राहिले होते. आता तर उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे या अधिवेशनात ते कर्जमाफीची घोषणा करतील काय, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. विशेष म्हणजे हे अधिवेशन केवळ सहा दिवसच चालणार असे बोलले जात आहे. या सहा दिवसात शेतकऱ्यांना काही मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण झाली आहे.

सोयाबीन उत्पादकही अडचणीत
यावर्षी अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन फार मोठया प्रमाणात घटले आहे. शेतमालाची प्रतवारी घसरल्याने अत्यल्प भाव मिळत आहे. शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. चार वर्षांपासून शेतकºयांनी कोरडा दुष्काळ अनुभवला. पाऊस नसल्याने शेतीत उत्पादन झाले नाही. यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस चांगला पडल्याने पिकांची वाढ चांगली झाली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठी आशा होती. परंतु गत महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अति पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनला कोंब फुटले असून पाण्याने सोयाबीन काळे पडले आहे. सोयाबीन काढणीच्या वेळेसच अति पाऊस आल्याने पिकांची उगवण खुंटली. पिकांचे अतोनात नुकसान झाले. यावर्षी अनेक शेतकऱ्यांना अंदाजे एकरी तीन ते पाच क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले आहे. परंतु सोयाबीनची प्रतवारी प्रचंड घसरलेली दिसून येत आहे. सध्या बाजारात मोजके सोयाबीन सोडले, तर बहुतांश शेतकºयांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल दीड हजारापासून ते २७०० रुपये भाव मिळत आहे. शिवाय सोयाबीन ओलसर असल्याने ते वाळवायला टाकण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.

Web Title: Take ten for five, but come for a cotton swab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.