हातात कुंचला घेऊन शिक्षकाने शाळेला दिला ज्ञानरूपी आकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:17 AM2021-02-22T04:17:29+5:302021-02-22T04:17:29+5:30
जिवती : विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणारा शिक्षक हा हरहुन्नरी असला पाहिजे, याची अनुभूती राज्याच्या तेलंगणा सीमेवरील अंतापूर येथील जिल्हा ...
जिवती : विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणारा शिक्षक हा हरहुन्नरी असला पाहिजे, याची अनुभूती राज्याच्या तेलंगणा सीमेवरील अंतापूर येथील जिल्हा परिषदेची शाळा बघितल्यावर आल्यावाचून राहत नाही. मोडकळीस व अर्धवट बांधकाम असलेल्या या शाळेचा रवींद्र धारणे या अवलिया शिक्षकाने कायापालटच केला आहे. आता ही शाळा बोलकी तर झालीच, शिवाय ती देखणीही झाली आहे.
कोरोनाकाळात रवींद्र धरणे या शिक्षकाने शाळेच्या दोन्ही इमारतींची रंगरंगोटी केली. शाळेच्या भिंतींवर वेगवेगळे शैक्षणिक आणि महापुरुषांचे चित्रे रेखाटली आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी अवघी शाळाच बोलकी झाली आहे.
महाराष्ट्र -तेलंगणा सीमेवर ही शाळा आहे. शून्यातून संघर्ष करत चार वर्षांपासून शाळेवर रुजू झालेल्या रवींद्र धारणेया शिक्षकाने गुणवतेचा ध्यास घेऊन या शाळेला ज्ञानरूपी आकार दिला आहे.
दोनशिक्षकी शाळा असून शशिकांत गेडाम हे मुख्याध्यापक आहेत. रवींद्र धारणे हे सहायक शिक्षक आहेत. या दोन्ही शिक्षकांनी शाळेसाठी वाटेल ते करत चार वर्ग असणाऱ्या ठिकाणी पाचवा वर्ग जोडून विद्यार्थिसंख्या दुपटीने वाढविली आहे. सध्या येथे २९ मुले शिकत आहेत. एक मूल एक झाड संकल्पनेतून वृक्षारोपण केले. या शाळेतील सर्व झाडे जगली आहेत. माझ्या शाळेतील बाग, शब्दांची अंताक्षरी, माती व कागदांच्या वस्तूंचे प्रदर्शन, ज्ञानरचनावादातून हसतखेळत गणितीय क्रिया उपक्रमांसह बालक्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा, नवरत्न स्पर्धा, नवोदय व शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेचे वर्ग घेतल्या जाते. विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख सुधाकर चंदनखेडे व जिवतीचे गटविकास अधिकारी डॉ. ओम रामावत यांनी या शाळेबाबत अभिमान व्यक्त केला.