२० लाख ३९ हजार रूपये खर्चूनही तलाव कोरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:52 PM2019-05-20T22:52:13+5:302019-05-20T22:52:47+5:30
राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवरील जैतापूर येथे २० लाख ३९ हजारांचा निधी खर्च करून तलाव बांधण्यात आला. परंतु नियोजनाचा अभाव व निकृष्ठ कामामुळे सहा वर्षे लोटूनही तलाव कोरडा असल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती : राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवरील जैतापूर येथे २० लाख ३९ हजारांचा निधी खर्च करून तलाव बांधण्यात आला. परंतु नियोजनाचा अभाव व निकृष्ठ कामामुळे सहा वर्षे लोटूनही तलाव कोरडा असल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे.
जैतापूर येथील नागरिकांना दरवर्षी जलसंकटाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे तलावाकरिता जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाने २० लाख ३९ हजार रूपयांचा निधी मंजूर केला. निविदा काढल्यानंतर मोठा गाजावाजा करून नोव्हेंबर २०१३ रोजी भूमीपूजन पार पडले. हे काम लवकरच होणार असल्याचे सांगण्यात आले होते. सुरुवातीला तलावाचे काही काम झाले. मात्र ते निकृष्ट दर्जाचे केल्याने पहिल्याच पावसाळ्यात तलावाच्या भिंतीला मोठे भगदाड पडले. त्यामुळे तलावातील पाणी वाहून गेले. त्यामुळे नागरिकांनी कंत्राटदार व तत्कालीन अभियंत्याची चंद्रपुरातील मुख्य अभियंत्याकडे तक्रार केली. त्यानंतर काम सुरू केले मात्र ते अद्याप अर्धवट आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचा ठपका ठेवून कनिष्ठ अभियंत्याला निलंबित करण्यात आले.
अधिकाऱ्यांच्या उदासीनतेचा फटका
संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे तलावाचे बांधकाम जैसे थे आहे. परिणामी जैतापुरातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटले. नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. गावात केवळ ४ हातपंप आहेत. महिलांना पाण्यासाठी रात्री जागरण करावे लागत आहे.