लाच प्रकरणात तलाठ्याला एक वर्षाचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:19 AM2021-06-19T04:19:28+5:302021-06-19T04:19:28+5:30
मारोती विठू दोडके रा. मुधोली, ता. भद्रावती यांच्या वडिलाच्या नावावर १४ एकर जमीन होती. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर वडिलोपार्जित जमीन ...
मारोती विठू दोडके रा. मुधोली, ता. भद्रावती यांच्या वडिलाच्या नावावर १४ एकर जमीन होती. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर वडिलोपार्जित जमीन वारसाना हक्काप्रमाणे तलाठी रेकॉर्डवर फेरफार करून सातबारा उतारा तयार करून देण्यासाठी अर्ज केला. यावेळी मुधोली सजा क्रमांक १८ चे तलाठी गिरीधर यादवराव पावडे याने दीड हजारांची लाच मागितली. त्यांनी या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे केली. त्यांच्या तक्रारीवरून ३१ डिसेंबर २००८ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक एस. एम. तोडासे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून १ जानेवारी २००९ रोजी तलाठी गिरीधर पावडेला लाच घेताना रंगहाथ अटक केली. या प्रकरणात भद्रावती येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास पूर्ण करून तत्कालीन पोलीस उपअधीक्षक एस. एम. तोडासे यांनी दोषारोप पत्र विशेष न्यायालय, वरोरा येथे सादर केले. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता गोविंदराव उराडे यांनी युक्तिवाद केला. तर चंद्रपूर पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे प्रमुख पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात वैभव गाडगे यांनी काम पाहिले.