विजेअभावी गोवरीचे तलाठी कार्यालय कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 10:19 PM2018-04-14T22:19:21+5:302018-04-14T22:19:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी साजाअंतर्गत येणाऱ्या हिरापूर, निंबाळा, चिंचोली येथील शेतकऱ्यांना सातबारा काढण्यासाठी गोवरी येथील तलाठी कार्यालयात यावे लागते. शासनाने सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाज आॅनलाईन केले आहे. शासनाचे हे एक प्रगतीचे पाऊल असले तरी गोवरी येथील तलाठी कार्यालयात वीज नसल्याने कार्यालयच बंद ठेवण्यात येत आहे.
शेतकºयांना सद्या पीक कर्ज घेण्यासाठी सातबाराची आवश्यकता पडत आहे. त्यासाठी शेतकरी गोवरी येथील तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. गोवरी येथील तलाठी सेवानिवृत्त झाल्यानंतर या ठिकाणी तलाठ्याचे पद रिक्त आहे. येथील प्रभार सास्ती येथील तलाठी मारोती अन्ने यांच्याकडे आहे. सास्ती आणि गोवरी या दोन साजात १० गावांचा समावेश असल्याने एवढ्या शेतकऱ्यांना भार पेलताना तलाठ्याची मोठी कसरत होत आहे.
परिणामी शेतकºयांना वेळेवर आॅनलाईन सातबारा मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी आॅनलाईन सातबारासाठी राजुरा येथील तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपले काम बाजुला सारावे लागत असून यातून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
त्यामुळे गोवरी येथील तलाठी कार्यालयात वीज उपलब्ध करून द्यावी व स्वतंत्र तलाठ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी व गोवरी वासीयांनी केली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देवून नागरिकांची समस्या सोडवण्याची मागणी आहे.
आॅनलाईन सातबारासाठी तहसील कार्यालयात चकरा
शासनाने सर्वच शासकीय कार्यालयातील कामे आॅनलाईन केली आहेत. त्यासाठी कार्यालयात वीज आहे किंवा नाही याची शहानिशा करणे आवश्यक होते. मात्र गोवरी येथील तलाठी कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून वीज नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारासाठी तहसील कार्यालय गाठावे लागत आहे.