प्रतिभावंतांनी समकालीन ज्वलंत प्रश्नांशी भिडून लेखन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:52 AM2021-03-04T04:52:13+5:302021-03-04T04:52:13+5:30
चंद्रपूर : प्रतिभावंतांनी समकालीन प्रश्नांना भिडण्याची व ते साहित्यातून प्रभावीपणे उजागर करण्याचा हा अस्वस्थ कालखंड आहे. केवळ आदिवासीच नव्हे ...
चंद्रपूर : प्रतिभावंतांनी समकालीन प्रश्नांना भिडण्याची व ते साहित्यातून प्रभावीपणे उजागर करण्याचा हा अस्वस्थ कालखंड आहे. केवळ आदिवासीच नव्हे तर समस्त शोषित समुदायाला मोकळा श्वास घेता यावा, यासाठी सर्जनशील कलावंत म्हणून आपली जबाबदारी ओळखून लेखन करावे, असे आवाहन प्रसिद्ध लेखक व कवी प्रभू राजगडकर यांनी केले. उलगुलान साहित्य मंचतर्फे रविवारी श्रमिक पत्रकार भवनात पार पडलेल्या प्रब्रह्मानंद मडावी लिखित ‘आपण कोणत्या देशात राहतो..!’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
मंचावर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विचारवंत डॉ. नीलकांत कुलसंगे, प्रा. डॉ. विद्याधर बनसोड, लेखिका कुसुम आलाम, जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम आदी उपस्थित होते. प्रभू राजगडकर म्हणाले, आदिवासी साहित्यिकांसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका आदी लेखप्रकार प्रकर्षाने हाताळून आपल्या इतिहासाची पुनर्मांडणी केली पाहिजे. आदिवासींच्या बोली भाषावैभवाचे संशोधन करण्याची गरज आहे. प्रब्रह्मानंद मडावी यांची कविता सर्जनशील अभिव्यक्तीची बंडखोर कविता असल्याचेही राजगडकर यांनी नमूद केले. डॉ. बनसोड, डॉ. कुलसंगे, कुसुम आलाम यांनी मडावी यांच्या कवितांचे शक्तीस्थळ अधोरेखित केले. मडावी यांनी काव्य प्रवासाचा आलेख मांडला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चित्रकार भारत सलाम यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक भोला मडावी, संचालन प्रा. रेवनदास शेडमाके यांनी केले. भय्याजी उईके यांनी आभार मानले.
आशयसंपन्न कवितांनी रंगले संमेलन
राजेश राजगडकर यांच्या अध्यक्षतेखाली नवोदित कवींचे काव्यसंमेलन घेण्यात आले. यामध्ये प्रा. नीरज आत्राम, नरेंद्र कनाके, संतोषकुमार उईके, प्रवीण आडेकर, मालती शेमले, सुधाकर कन्नाके, धर्मेंद्र कन्नाके, रत्नमाला मोकाशी आदींनी आशयसंपन्न कविता सादर केल्या. संचालन नरेश बोरीकर यांनी केले. सहभागी कवींना प्रब्रह्मानंद मडावी, डॉ. प्रवीण येरमे, डॉ. शारदा येरमे यांच्या हस्ते कोविडयोद्धा दिवंगत डॉ. सुनील टेकाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.