तळोधीचे प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:51 AM2021-02-06T04:51:50+5:302021-02-06T04:51:50+5:30
दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त सावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांची ...
दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त
सावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. दरम्यान शासनाने सावरगाव येथील ॲलोपॅथिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.एस. घोनमोडे यांना तेथे प्रभारी म्हणून रुजू केले आहे. परिणामी सावरगाव येथील रुग्णांना फटका बसत आहे.
शासनाच्या या निष्काळजीपणामुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
नागभीड तालुक्यातील तळोधी हे सर्वात मोठे गाव आहे. आणि अलीकडे अपर तालुका म्हणूनही घोषित झालेले आहे. मात्र तेही नावापुरतेच अस्तित्वात आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभारही मोठा आहे. असे असताना येथील दोन्ही अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. रुग्ण तपासणी, प्रसूत महिलांचे आरोग्य आदी अनेक कामे येथे असतात. या कार्यासाठी शासनाने सावरगाव येथील ॲलोपॅथिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी. एस.घोनमोडे यांच्याकडे प्रभार दिलेला आहे. ते योग्यरीत्या सांभाळतही आहेत, मात्र यामुळे सावरगावातील व परिसरातील रुग्णांना मोठा फटका बसत आहे. तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्वी डॉ.शरद खानझोडे हे अधिकृत वैद्यकीय अधिकारी म्हणून कारभार सांभाळीत होते. मात्र त्यांची बदली झाल्याने येथील दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तालुक्यातील सर्वात मोठ्या गावातील आरोग्य केंद्रात डॉक्टरांचे पद रिक्त असल्याने हे रुग्णालयच आजारी पडले आहे की काय असे नागरिकांना वाटू लागले आहे.
तळोधीसारख्या मोठ्या गावातील एवढ्या मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोनपैकी एकही वैद्यकीय अधिकारी अधिकृत नसल्याने येथील रुग्ण तथा नागरिकांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे, तर दुसरीकडे सावरगाव तथा परिसरातील रुग्णांना आरोग्य सुविधेपासून वंचित केल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रशासन किती गंभीर आणि सज्ज आहे, हे स्पष्ट होते.