तळोधी - गंगासागर हेटी रस्त्याच्या कडेला मातीचा भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:20 AM2021-07-16T04:20:34+5:302021-07-16T04:20:34+5:30
अपघाताचे प्रमाण वाढले : बांधकाम विभागाने लक्ष द्यावे सावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी-गंगासागर हेटी, उश्राळ मेंढा, आकापूर या नव्यानेच ...
अपघाताचे प्रमाण वाढले : बांधकाम विभागाने लक्ष द्यावे
सावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी-गंगासागर हेटी, उश्राळ मेंढा, आकापूर या नव्यानेच तयार केलेल्या डांबरी मार्गालगत योग्यरीत्या मुरूम पसरविण्यात आला नाही. शिवाय आता मुरूम ऐवजी पांढरी माती टाकण्याचा प्रकार सुरु असल्याने अपघाताच्या घटनात वाढ झाली आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग लोकांच्या डोळ्यात धूळ झोकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप उश्राळ मेंढा, गंगासागर हेटी, आकापूर येथील तिन्ही ग्रामपंचायतच्या सरपंचांनी केला आहे.
तळोधी -गंगासागर हेटी, उश्राळ मेंढा ,आकापूर हा एकमेव रहदारीचा मार्ग काही महिन्यांपूर्वी पूर्णतः उखडलेला होता. मात्र सततच्या पाठपुराव्याने या मार्गावर डांबरीकरण करण्यात आले. डांबरीकरण झाल्यानंतर मार्गाच्या दोन्ही बाजूंना मुरूम टाकण्यात आले नव्हते. यासाठी उश्राळ मेंढा, गंगासागर हेटी, आकापूर या तिन्ही ग्रामपंचायतच्या सरपंचांनी व ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास निवेदन दिले. त्यानंतर दोन्ही बाजूंना मुरूम पसरविण्यात आले. मात्र योग्यरीत्या मुरूमाचा भरणा करण्यात आला नसल्याने रस्ता अरुंद झाला आणि याठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले. उर्वरित रस्त्यावर आता मुरुम ऐवजी पांढरी माती टाकण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्याचे लवकरच तीन-तेरा वाजणार आहे.
कोट
मुरुम ऐवजी माती टाकण्यात आल्याने तळोधी- गंगासागर हेटी रस्त्यावर छोटे -मोठे अपघात झाले आहेत. आणि आता काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर या रस्त्याच्या खाली पलटला होता. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग लोकांच्या जीवावर उठला आहे, हे स्पष्ट दिसते.
-हेमराज लांजेवार, जिल्हाध्यक्ष
सरपंच सेवा महासंघ,चंद्रपूर