तळोधीतील बाजार ओटे केवळ शोभेचे
By admin | Published: May 12, 2017 02:15 AM2017-05-12T02:15:58+5:302017-05-12T02:15:58+5:30
तालुका होण्यासाठी तळोधी (बा.) येथील नागरिक संघर्ष करीत असतानाच दुसरीकडे येथील मुख्य प्रवेशद्वाराच्या रस्त्यावर
बाजार भरतो मुख्य रस्त्यावर : अतिक्रमण हटविण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
तळोधी (बा.): तालुका होण्यासाठी तळोधी (बा.) येथील नागरिक संघर्ष करीत असतानाच दुसरीकडे येथील मुख्य प्रवेशद्वाराच्या रस्त्यावर गुजरी बाजार भरत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली असते. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने तळोधी येथील जनतेला रस्तावरून मार्गक्रमण करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
तळोधी (बा.) ग्रामपंचायतीने नागरी सुविधामधून १० ते १५ लाखांचे बाजार ओट्यांचे बांधकाम केले आहे. मात्र त्याठिकाणी बाजार भरत नसून ओटे रिकामे असतात. आता हे ओटे केवळ शोभेचे वस्तू बनून राहिले आहेत. तळोधी येथील मुख्य प्रवेशद्वारांच्या दोन्ही बाजुला भाजीपाला विक्रेते व फेरीवाले आपली दुकाने थाटतात. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना लोकांना अनेकदा अडचणी येत असतात. तसेच भर ररस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तीन महीन्यांपूर्वी तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला सदर रस्त्यावरील आतिक्रमण हटविण्यात यावे व भाजीबाजार नियोजित ओट्यांवरच भरविण्यात यावा, या मागणीचे निवेदन नागरिकांच्या स्वाक्षरीनिशी देण्यात आले होते. मात्र तळोधी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केल्याने समस्या निर्माण झाली आहे.
तसेच या मुख्य रस्त्यावर नेहमी केरकचरा टाकला जातो. यातून दुर्गंधी सुटते. याकडेसुध्दा ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परीणाम होत आहे. या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवून त्वरित रस्ता मोकळा करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे.