तळोधी पोलीस ठाणे न्याय हक्काचे रक्षण करणारे ठरावे
By admin | Published: January 26, 2016 12:38 AM2016-01-26T00:38:14+5:302016-01-26T00:38:14+5:30
पोलीस स्टेशन म्हणजे लोकांच्या न्याय हक्काच मंदिर असते. पोलीस स्टेशन मधून सर्व सामान्य माणसाला न्याय मिळण्याची अपेक्षा असते.
सुधीर मुनगंटीवार : नवनिर्मित पोलीस ठाण्याचे उद्घाटन
चंद्रपूर : पोलीस स्टेशन म्हणजे लोकांच्या न्याय हक्काच मंदिर असते. पोलीस स्टेशन मधून सर्व सामान्य माणसाला न्याय मिळण्याची अपेक्षा असते. तळोधी पोलीस स्टेशन या परिसरातील लोकांच्या न्याय हक्काचे रक्षण करणारे ठरावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
तळोधी (बा.) येथील नवनिर्मित पोलीस ठाण्याच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खा. अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, आ. कीर्तिकुमार भांगडिया, विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, माजी आमदार अतुल देशकर, सभापती देवराव भोंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू व ठाणेदार विवेक सोनवणे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तळोधी पोलीस स्टेशन व्हावे ही या परिसरातील नागरिकांची बऱ्याच दिवसांची मागणी होती. त्यानुसार शासनाने २०१४ मध्ये या पोलीस स्टेशनला मान्यता दिली. या पोलीस स्टेशन अंतर्गत ४२ गावांचा समावेश आहे. पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीसाठी चारगाव मेंढा वलनी या ठिकाणी पाच एकर जागाही मंजूर करण्यात आली आहे.
इमारत बांधण्यासाठी लवकर निधी देण्यात येईल, असे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. बल्लारपूर, पडोली व तळोधी येथील पोलीस स्टेशन इमारत आधुनिक व सुसज्ज व्हावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
आमदार कीर्तिकुमार भांगडीया, विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनीची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन बबन बुरनुले यांनी तर आभार अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिह राजपूत यांनी मानले. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
विकास प्रक्रिया लोकचळवळ व्हावी
तळोधी बाळापूर या गावातील सिमेंट रस्ते बांधकासाठी २५-१५ या अंतर्गत येत्या अर्थसंकल्पात २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व मामा तलावाचे नूतनीकरण, दुरुस्ती व शेती सिंचनासाठी वापर हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विकास हा केवळ शासनाचा कार्यक्रम न राहता तो लोकचळवळ व्हावी. लॉजिस्टिक हब, वैद्यकीय महाविद्यालय, सैनिकी शाळा, विजेच्या दरात कपात व मेक इन चंद्रपूर या सारख्या विकासाच्या योजनांमुळे विदर्भ विकासाला गती प्राप्त झाली आहे, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.