बिबी ग्रामपंचायतीला तालुका ‘स्मार्ट व्हिलेज’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:20 PM2018-03-31T23:20:53+5:302018-03-31T23:20:53+5:30
तालुक्यात लोकसंख्येच्या दृष्टीने द्वितीय क्रमांकावर असलेली बिबी ग्रामपंचायत तालुक्यात विकासकामांमुळे मॉडेल व्हिलेज बनली असून नुकताच २०१७-१८ या वर्षाचा तालुका स्मार्ट व्हिलेज पुरस्कार प्राप्त झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : तालुक्यात लोकसंख्येच्या दृष्टीने द्वितीय क्रमांकावर असलेली बिबी ग्रामपंचायत तालुक्यात विकासकामांमुळे मॉडेल व्हिलेज बनली असून नुकताच २०१७-१८ या वर्षाचा तालुका स्मार्ट व्हिलेज पुरस्कार प्राप्त झाला.
बिबी ग्रामपंचायतची विकासाकडे वाटचाल सुरु असून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये विकास कामे करण्याचा उत्साह आहे. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे बिबी गाव नावारूपास आले आहे. शासनाच्या विविध विभागातील अधिकारी व पदाधिकाºयांनी ग्रामपंचायतीला भेटी देऊन पाहणी केली असता विकासाबाबत समाधान व्यक्त केले. नुकताच कोरपना येथील कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पुरस्कार जाहीर झाला असून सरपंच मंगलदास गेडाम, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, ग्रामविकास अधिकारी अरुण वाकूडकर यांचा सत्कार करण्यात आला.
बिबी ग्रामपंचायतीमध्ये बिबी, धामणगाव, नैतामगुडा, आसन (बु.), गेडामगुडा अशी पाच गावे समाविष्ठ आहे. गेल्या १२ महिन्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गटग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट गावातील १५ आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत एमएस-सीआयटी प्रशिक्षण, १५ विद्यार्थ्यांना मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण व परवाना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसन (बु.), धामणगाव व नैतामगुडा या शाळांना ई-लर्निंगसाठी संगणक संच, गावातील मुख्य मार्गावर, स्मशानभूमी व क्रीडांगणावर वृक्षारोपण, मनरेगाच्या माध्यमातून ६० शोषखड्डे, १८० एल.ई.डी. बल्ब, अल्ट्राटेक सिमेंट वेलफेअर फाउंडेशन व ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील लोकांना शुद्ध व थंड पाण्याचे एटीएम तसेच विविध रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण, बंद गटारे, मुख्य प्रवेशद्वाराचे सौंदर्यीकरण, कचराकुंडी, युवकांसाठी वाचनालय व व्यायामशाळेची निर्मिती, सौर ऊर्जा पाणी पंप, तालुकास्तरीय पशु प्रदर्शन, पशु चिकित्सा शिबिरे, ‘ग्राम की बात’ कार्यक्रमातून गावकºयांचे प्रबोधन, गावातील लोकांना विविध ग्रामसभाविषयक माहिती, शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी स्पीकरच्या माध्यमातून दिवंडी दिली जाते. गटग्रामपंचायतीमधील बिबी, धामणगाव, आसन (बु.), नैतामगुडा व गेडामगुडा या पाचही जिल्हा परिषद शाळांना एक वर्गखोली डीजिटल करण्यासाठी एल.ई.डी. टी.व्ही. व इतर साहित्य देण्यात आले. अशाप्रकारची अनेक महत्वपूर्ण कामे अल्पावधीत झाल्याने गावाचा विकासदर समाधानकारक आहे.
पेसा निधी, चौदावा वित्त आयोग, सामान्य निधी या निधीच्या माध्यमातून नियमित कामे होत असली तरी शासनाकडे पाठपुरावा करून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनेक कामे करून घेतल्या जात आहे. अल्पसंख्याक, तांडावस्ती, ठक्करबाप्पा व दलितवस्ती निधीच्या माध्यमातून कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीचा पाठपुरावा सतत सुरू आहे.
विशेष म्हणजे, ग्रामपंचायत वृक्षलागवडीला जास्त महत्त्व देत आहे. अल्ट्राटेक सिमेंट वेलफेअर फाउंडेशन, अंबुजा सिमेंट फाउंडेशन व ग्रामपंचायतच्या वतीने ३ हजार वृक्ष लावण्यात आले.
तीन शाळांना आय.एस.ओ. मानांकन
गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा गेडामगुडा, बिबी व आसन (बु.) या तीन शाळांना आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाले आहे. एकाच ग्रामपंचायतमधील या तिन्ही शाळा असल्याने ग्रामपंचायतच्या नावलौकिकात भर पडली आहे.
शुद्ध व थंड पाणी
अल्ट्राटेक सिमेंट वेलफेअर फाउंडेशन व ग्रामपंचायतीच्या वतीने पेसा निधीअंतर्गत गावातील लोकांसाठी शुद्ध व थंड पाण्याचे एटीएम सुरु करण्यात आले असून अल्प रकमेमध्ये पुरवठा होत आहे. ५ रुपयात लोकांना २० लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य टिकून राहण्यास मदत होत आहे.