भेजगावात पाण्यासाठी महिलांचा टाहो, तीन दिवसांपासून नळ योजना बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 11:14 AM2023-03-30T11:14:51+5:302023-03-30T11:21:07+5:30
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
शशिकांत गणवीर
भेजगाव (चंद्रपूर) : मूल तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भेजगाव येथे तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प पडला असून गावात पाणी समस्या गंभीर बनली आहे. परिणामी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
भेजगाव येथे कोटी रुपये खर्चून नवीन नळ योजना कार्यान्वित होणार आहे. मात्र, तोपर्यंत जुन्याच नळ योजनेवर गावकऱ्यांची तहान भागणार आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे मोटार जळाल्याचे कारण पुढे करीत तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प केल्याने ग्रामपंचायत विरोधात संताप व्यक्त केल्या जात आहे.
बोरचांदली व १९ गावांकरिता कार्यान्वित असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा या गावाला आधार होता. मात्र, ही योजना मागील आठ दिवसांपासून लिकेज दुरुस्तीच्या नावावर बंद आहे. त्यामुळे गावात कोणत्याही योजनेचे पाणी येणे बंद झाले आहे. परिणामतः गावात पाण्यासाठी महिलांचा हाहाकार माजला आहे.
जवळपास तीन हजार लोकवस्तीच्या गावात तीस वर्षांपूर्वीपासून जिल्हा परिषदेची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. त्यामुळे गावात इतर पाण्याच्या सुविधा तोकड्या आहेत. असे असले तरी एकाही बोअरवेल व विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे इतरत्र भटकंती करूनही पिण्याचे पाणी मिळत नसल्याने महिला संतप्त झाल्या आहेत.
आरो प्लांट बसविताच पडला बंद
ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोग निधीतून लाखो रुपये खर्च करून आरो प्लांट बसविले. मात्र, अल्पावधीतच ते बंद पडल्याने पदाधिकाऱ्यांनी या प्लांटच्या नावावर निधीची वाट लावल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. सरपंच, सचिव गावात न राहता तालुक्यावरून गावाचा कारभार हाकत असल्याने स्थानिक समस्येपासून त्यांची नाळ तुटत असून गाव विकासापासून दूर आहे. परिणामतः गावाशी काहीही देणे घेणे नसल्याच्या तोऱ्यात पदाधिकारी वागत आहेत. आपण स्वतः सोयी सुविधेकरिता तालुक्यावर राहत असल्याने सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. ग्रामपंचायतीने पाणी समस्येकडे जातीने लक्ष देत त्वरित शुद्ध पाणीपुरवठा नियमित सुरू करावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.