तपाळ योजना कुचकामी, नागभीड तहानलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:35 AM2021-06-09T04:35:25+5:302021-06-09T04:35:25+5:30
१५ दिवसांपासून नागभीडमध्ये टॅंकरने पाणी पुरवठा नागभीड : नागभीडला पाण्याचा पुरवठा करणारी तपाळ पाणीपुरवठा योजना सध्या कुचकामी ठरत आहे. ...
१५ दिवसांपासून नागभीडमध्ये टॅंकरने पाणी पुरवठा
नागभीड : नागभीडला पाण्याचा पुरवठा करणारी तपाळ पाणीपुरवठा योजना सध्या कुचकामी ठरत आहे. या योजनेकडून पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने येथे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यावर उतारा म्हणून नगर परिषदेवर टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. टँकरने हा पाणीपुरवठा जवळपास १५ दिवसांपासून सुरू असल्याची माहिती आहे.
आता उन्हाळा सुरूच आहे. प्रत्येकाची पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे. उल्लेखनीय बाब ही, की नागभीड येथील बहुतेक नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी तपाळ पाणीपुरवठा योजनेवरच अवलंबून आहेत. मात्र, सद्यस्थितीत या योजनेकडून पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. सदर प्रतिनिधीने यासंदर्भात योजनेच्या एका अधिकाऱ्यास विचारणा केली असता कधी लिकेजमुळे, तर कधी अन्य कारणांमुळे पाणीपुरवठा बरोबर होत नसल्याची माहिती दिली. मात्र, जिल्हा परिषदेकडून या योजनेची देखभाल करण्यासाठी एका अभियंत्याची आणि कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असूनही योजनेत निर्माण होणाऱ्या त्रुटी वेळीच का दूर का करण्यात येत नाहीत, असा सवाल निर्माण होत आहे.
सध्या तपाळ योजनेकडून नागभीडला अतिशय अल्प पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागभीडकरांची चांगलीच गैरसोय होत आहे. ही गैरसोय होऊ नये, यासाठी नागभीड नगर परिषदेकडून पाच टँकर लावण्यात आहेत. हे पाच टँकर दिवसभरातून २८ ते ३० फेऱ्या मारत असल्याची माहिती आहे.
बॉक्स
पाईपलाईन फुटणेही नेहमीचेच
तपाळ पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटणे ही नेहमीचीच बाब झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात ही पाईपलाईन फुटली होती. त्यावेळीही पाच, सहा दिवस तपाळ पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला होता. आता या योजनेपासून अतिशय अल्प प्रमाणात पाणी मिळत असल्याने पुन्हा पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच नगर परिषदेवर टँकर लावण्याची पाळी आली.
कोट
सध्या तपाळ पाणीपुरवठा योजनेकडून वेगवेगळ्या कारणांनी कमी प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे पाण्याचा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या पाच टँकर नगर परिषद क्षेत्रात सुरू आहेत.
- गणेश तर्वेकर, उपाध्यक्ष तथा सभापती पाणीपुरवठा, न. प., नागभीड