सर्वांत कमी उंचीच्या ताराबाई महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघातून सातव्यांदा निवडणूक रिंगणात!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 11:42 AM2024-11-11T11:42:14+5:302024-11-11T11:42:43+5:30
ताराबाईंनी आतापर्यंत सात वेळा निवडणूक लढविली असून, त्यांना १९९४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सहा हजार मते मिळाली होती.
प्रवीण खीरटकर, लोकमत न्यूज नेटवर्क, वरोरा (चंद्रपूर) : जनतेचे प्रश्न निकाली लागावे, समाजातील शेतकरी, महिला आणि गरजूंना न्याय मिळावा, याकरिता शेतकरी कुटुंबातील तारा महादेव काळे या ६१ वर्षीय महिला वरोरा विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. जेमतेम ३ फूट ४ इंच उंची असलेल्या ताराबाई या राज्यात सर्वांत कमी उंचीच्या उमेदवार असाव्यात.
ताराबाईंनी अपक्ष उमेदवार म्हणून आपली उमेदवारी दाखल केली. निवडून आल्यास गरिबांकरिता असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविणार, आयुष्मान भारत, आरोग्य विमा, पीक विमा, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजना या अजूनही जनतेपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्या आजही फक्त कागदावरच आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
१९९४ मध्ये मिळाली होती सहा हजार मते
ताराबाईंनी आतापर्यंत सात वेळा निवडणूक लढविली असून, त्यांना १९९४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सहा हजार मते मिळाली होती.
असा आहे वचननामा
शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. वरोरा आणि भद्रावती या दोन्ही तालुक्यांत बेरोजगारांची मोठी फौज आहे. त्यांच्या हाताला काम मिळवून देणे, हे आपले प्राधान्य असेल, असेही त्यांचे म्हणणे आहे.
महिलांवरील अत्याचार, पिळवणूक आणि मालमत्ता बळकाविणे या गोष्टींवर आळा घालण्याकरिता मी प्रयत्न करेल आणि शेवटपर्यंत त्यांच्या हितासाठी लढेन, असे त्यांनी आपल्या वचननाम्यात स्पष्ट केले.