कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या बालकांसाठी टास्क फोर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:27 AM2021-05-23T04:27:34+5:302021-05-23T04:27:34+5:30
चंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या काळात सर्वांत जास्त लक्ष महिला व बालकांवर देणे गरजेचे आहे. कोविडमुळे दोन्ही पालक दगावले ...
चंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या काळात सर्वांत जास्त लक्ष महिला व बालकांवर देणे गरजेचे आहे. कोविडमुळे दोन्ही पालक दगावले असल्यास अशा बालकांची नोंद करून घेत त्याची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले.
महिला व बालकांसंबंधीचे विषय, तसेच त्यांच्याशी संबंधित शासकीय संस्था याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्ह्याचा आढावा घेतला.
यावेळी सदर बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण संग्राम शिंदे, जिल्हा परिविक्षा अधिकारी रमेश दडमल, बाल संरक्षण कक्ष अधिकारी अजय साखरकर उपस्थित होते.
कोरोनामुळे अनेकांचे पालकत्व हरवले आहे. आई- वडील दोघांचेही निधन झाल्याने मुले अनाथ झाली आहेत. बालकांच्या जीवनावर याचा गंभीर परिणाम होत आहे. या मुलांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची, तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी यासारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त आहे. बाल न्याय समितीमार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बालकांची काळजी व संरक्षणासंबंधी कार्य करणाऱ्या संस्थांची माहिती घ्यावी त्याबाबत आढावा घेण्यात यावा, अशा सूचना महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
बैठकीमध्ये मुलांचे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित मुद्यांच्या अनुषंगाने व इतर मुद्यांबाबत जिल्हास्तरावर टास्क फोर्स गठित करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या टास्क फोर्समध्ये संबंधित जिल्ह्याच्या क्षेत्रातील महानगरपालिकांचे आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक (ग्रामीण), जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य म्हणून, तर जिल्हा बालसंरक्षण अधिकारी हे समन्वयक म्हणून काम पाहतील, तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे या टास्क फोर्सचे सदस्य सचिव आहेत. जिल्हाधिकारी हे टास्क फोर्सच्या कामकाजावर संपूर्ण नियंत्रण ठेवतील, असेही त्या म्हणाल्या.
बॉक्स
दर पंधरवड्यात होणार बैठक
दर पंधरवाड्यातून एकदा टास्क फोर्सची बैठक आयोजित करून कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील बालगृहे, निरीक्षण गृहातील प्रवेशित व तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा, तसेच टास्क फोर्सच्या कामकाजाचा आढावा घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही ना. ठाकूर यांनी दिल्या.