शहरातील वीज खांबांवरही कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:24 AM2017-12-29T01:24:56+5:302017-12-29T01:25:13+5:30
मनपाच्या हद्दीत वीज वितरण कंपनीचे अनेक वीज खांब, ट्रान्सफॉर्मर, डीपी आहेत. आता या वीज खांबावर कर लादण्याचा निर्णय मनपाच्या आमसभेत घेण्यात आला. यासोबत शहरातील सर्व लॉनसाठी दरनिश्चितीही करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मनपाच्या हद्दीत वीज वितरण कंपनीचे अनेक वीज खांब, ट्रान्सफॉर्मर, डीपी आहेत. आता या वीज खांबावर कर लादण्याचा निर्णय मनपाच्या आमसभेत घेण्यात आला. यासोबत शहरातील सर्व लॉनसाठी दरनिश्चितीही करण्यात आली.
महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी मनपाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी महापौर अंजली घोटेकर होत्या. सभेला सुरुवात होताच वीज खांबावरील कराचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला. मनपाच्या हद्दीत वीज वितरण कंपनीचे अनेक खांब आहेत. या खांबासाठी वीज वितरण कंपनी कुठलाही कर मनपाला देत नाही. मात्र आता मनपाच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोनातून वीज खांबावर कर आकारण्याविषयी सभागृहाला मंजुरी मागण्यात आली. मात्र नगरसेवक पप्पू देशमुख व काही नगरसेवकांनी यांनी याला विरोध दर्शविला. मनपा वीज खांबावर कर आकारेल तर वीज वितरण कंपनी ग्राहकांकडून हा कर वसूल करेल. त्यामुळे नागरिकांवरच आर्थिक भुर्दंड पडेल. आधीच विविध करांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आता आणखी हा कर नको, असे देशमुख यांनी सभागृहाला सांगितले. यामुळे काही वेळ सभागृहात गोंधळ निर्माण झाला. मात्र यातून मनपाचे कोट्यवधींचे उत्पन्न वाढणार असल्याने बहुमताचा आधार घेत या विषयाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर शहरात असलेल्या लॉनच्या दरनिश्चितीचा विषय चर्चेसाठी आला. यात उच्च वस्ती, मध्यम वस्ती आणि निम्न वस्ती याप्रमाणे वर्गीकरण करून त्यानुसार बांधकामाचा प्रकार पाहत दर ठरविण्यात आले.
अपार्टमेंटमध्ये कचऱ्यांवर प्रक्रिया
शहरातील अपार्टमेंटमधून मोठ्या प्रमाणात ओला व सुका कचरा निघतो. त्यामुळे या ठिकाणी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करण्यात यावी, असेही ठरविण्यात आले. यालाही प्रारंभी काही नगरसेवकांनी विरोध दर्शविला. मात्र सहायक आयुक्त बेहेरे यांनी या अपार्टमेंट कचºयाचे बल्क प्रोड्युसर आहेत आणि अधिनियमातही तशी तरतूद आहे, असे सांगितले. त्यानंतर हा विषय मंजूर करण्यात आला. जी व्यक्ती या प्रक्रियेत सहभागी होणार नाही, त्यांच्याकडून तीन पट गृहकर वसूल करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
वजनकाटा नाक्याची होणार चौकशी
मनपाने आपल्या हद्दीत येणाऱ्या वाहनांसाठी वजनकाटा नाके लावले आहेत. मात्र या नाक्यावरून ओव्हरलोड वाहनेही सर्रास सोडली जातात. यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. त्यामुळे या नाक्यातील व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिली. त्यावर महापौरांनी चौकशी केली जाईल, असे सांगितले.
विरोधकांचा सभात्याग
केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी आम्ही संविधान बदलणार आहोत, असे वक्तव्य करीत संविधानाचा अवमान केला आहे. याबाबत मनपाच्या सभेत निषेधाचा ठराव घेण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका सुनिता लोढिया व विरोधकांनी केली. मात्र हा विषय सभागृहातील चर्चेचा विषय नाही, असे महापौरांनी सांगितले. त्यावर विरोधकांनी सभा त्याग केला.
रामाळा तलाव मनपा सांभाळणार
रामाळा तलाव सध्या जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारित आहे. मात्र मनपा हद्दीतील हा तलाव मनपाला हस्तांतरित करण्याविषयीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्याबाबत सभागृहात चर्चा करण्यात आली. मनपा हा तलाव आपल्याकडे घेऊन ठेकेदारांमार्फत त्याची देखभाल, दुरुस्ती करणार आहे.