बल्लारशाह रेल्वे स्थानकांवर कुल्हाडऐवजी पेपर कपमधेच चहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:24 AM2021-01-04T04:24:37+5:302021-01-04T04:24:37+5:30
बल्लारपूर : रेल्वे स्थानकांवर यापुढे ‘पेपर कप’ ऐवजी ‘कुल्हाड’ मधून चहा द्यावा, असे निर्देश एक महिन्यापूर्वी देण्यात आले आहेत, ...
बल्लारपूर : रेल्वे स्थानकांवर यापुढे ‘पेपर कप’ ऐवजी ‘कुल्हाड’ मधून चहा द्यावा, असे निर्देश एक महिन्यापूर्वी देण्यात आले आहेत, परंतु बल्लारशाह रेल्वे स्थानकावर अजूनही पेपर कपमधेच चहा मिळत आहे. कुल्हाडचा पत्ताच नाही.
केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी देशातील सर्व रेल्वे स्थानके प्लास्टिकमुक्त करण्यासाठी रेल्वे स्थानकावर ‘कुल्हाड’मधून चहा देण्याचा निर्णय घेतला. ११ वर्षांआधी तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी पहिल्यांदा रेल्वे स्टेशनवर कुल्हाडमधून चहा देण्याची अंमलबजावणी केली होती. आता पुन्हा प्लास्टिकमुक्त अभियान रेल्वे स्थानकावर राबविण्यासाठी कुल्हाडमधून चहा देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
कुल्हाडमधून रेल्वे प्रवाशांना चहा देण्यात येणार असल्याने रेल्वे स्थानकावरील स्टॉलचालकांना शहरातील कुंभार व्यावसायिकांकडून कुल्हाड विकत घ्यावे लागतील, परंतु शहरात कुंभार नसल्यामुळे कुठून कुल्हाड घ्यावे, हा प्रश्न स्टॉलचालकांना पडला आहे.
कोट
आमच्याकडे रेल्वे प्रशासनाचे पत्र आले आहे. कुल्हाडमधून चहा देण्यास सांगितले आहे, परंतु येथे कुल्हाड मिळतच नाही. कुठून घ्यायचे हे रेल्वे प्रशासनाने सांगितले नाही. म्हणून सध्या पेपर कपमधेच चहा देणे सुरू आहे, परंतु लवकरच आम्ही कुल्हाडमधून चहा देण्याचा प्रयत्न करू.
-प्रमोदसिंग राजाबद, फुडप्लाजा, रेल्वे स्थानक बल्लारशाह
कोट
निर्णय जरी चांगला असला तरी कुल्हाडमधून चहा दिला, तर ग्राहकांकडून जादा पैसे घ्यावे लागणार. पेपर कप ५० पैशात मिळतो. कुल्हाड महाग असणार, तर चहा कुल्हाडमधून विकणे परवडणार नाही.
-मारोती सोमकुवर, रेल्वे स्टाल चालक,
कोट
पेपर कपपेक्षा कुल्हाड हे मातीचे असल्यामुळे त्यातून चहा घेणे आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने हितकारक आहे. याचा रेल्वे प्रवाशांना फायदा होईल, परंतु आमच्याकडे कुंभार नसल्यामुळे कुल्हाड मिळत नाही.
- जयकरणसिंग बजगोती, डीआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे