शिक्षक गैरहजर, विद्यार्थी वाऱ्यावर !

By Admin | Published: July 25, 2016 01:13 AM2016-07-25T01:13:20+5:302016-07-25T01:13:20+5:30

बल्लारपूर तालुक्यातील आदिवासी विकास विभागामार्फत अनुदानित आश्रमशाळांची दैनावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.

Teacher absent, student wind! | शिक्षक गैरहजर, विद्यार्थी वाऱ्यावर !

शिक्षक गैरहजर, विद्यार्थी वाऱ्यावर !

googlenewsNext

आश्रमशाळेची दैनावस्था : बल्लारपूर पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली झाडाझडती
चंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील आदिवासी विकास विभागामार्फत अनुदानित आश्रमशाळांची दैनावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. शाळेचे शिक्षक गैरहजर असल्याने विद्यार्थी मस्तीमध्ये दंग असल्याचे बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम व गटविकास अधिकारी बी. बी. गजभे यांना आढळून आले आहे. एकाच वर्गखोलीत इतरत्र पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवून शिक्षण देण्यात येत आहे. सर्पदंशाच्या घटना घडत असताना या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता येथील स्व. ताराचंद नाईक प्राथमिक आश्रमशाळेला उपसभापती मेश्राम यांनी भेट दिली तेव्हा सात पैकी एकही शिक्षक शाळेत उपस्थित नसल्याचे आढळून आले. काही वेळाने उपसभापतींच्या भेटीची माहिती मिळाल्यानंतर शाळेचे सहाय्यक पी. एम. झाडे व जी. आर. राठोड दाखल झाले. शाळेमध्ये झाडाझडती घेतल्यावर तब्बल पाच शिक्षक अनुपस्थित असल्याची माहिती मिळाली. शिक्षकांची अनुपस्थिती मानोरा येथीलही श्रीराम विमुक्त जाती भटक्या जमाती प्राथमिक आश्रमशाळेत आढळून आली. या शाळेत मुख्याध्यापक एस. जी. जवळकर अनुपस्थित होते. त्यामुळे इतर शिक्षकांच्या उपस्थितीचा प्रश्नच नाही.
कोटीमक्ता येथील ताराचंद नाईक आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत २१७ विद्यार्थी- विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात आला आहे. परंतु उपसभापती मेश्राम यांना शाळेत केवळ १३९ विद्यार्थी आढळून आले. मानोरा येथील श्रीराम आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत १२२ विद्यार्थी- विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात आला आहे. प्रत्यक्षात केवळ १९ विद्यार्थी २० जुलै रोजी भेटीदरम्यान शाळेत आढळून आले. गिलबिली येथील यशोधरा देवी आदिवासी अनुदानित निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक होती. तेथे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असून ३८८ पैकी २२१ विद्यार्थी उपस्थित होते. ताराचंद नाईक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची पुस्तके अडगळीत पडून होती. (प्रतिनिधी)

तीन वर्गखोल्यांची शाळा
कोर्टीमक्ताच्या शाळेत एक खोलीमध्ये पहिली ते चौथीपर्यंत ४३ विद्यार्थी एकत्र बसविण्यात येत असल्याचे दिसले. दुसऱ्या खोलीत पाचवी व सहावीचे ३९ आणि तिसऱ्या खोलीमध्ये सातवी व आठवीचे ४६ असे एकूण १३९ विद्यार्थी केवळ तीन खोल्यांमध्ये बसून शिक्षण घेत आहे. ही शाळा तीन वर्गखोल्यांची आहे. त्याकडे आदिवासी विकास विभागाचे लक्ष नाही.

कोर्टीमक्ता, मानोरात अधीक्षक गैरहजर
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या शाळा निवासी स्वरूपाच्या असल्याने अधीक्षक पूर्णवेळ शाळेत उपस्थित असायला पाहिजे. प्रत्यक्षात ताराचंद नाईक आश्रमशाळेचे अधीक्षक मनोज मुरकुटे व श्रीराम आश्रमशाळेचे अधीक्षक डी. डी. फुलझेले हे दोघेही अनुपस्थित आढळले.

आरोग्य तपासणी व सुरक्षा अधांतरी
ताराचंद नाईक व श्रीराम आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीबाबत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यशोधरादेवी निवासी आश्रमशाळेत गेल्या सत्रात २७ फेब्रुवारी २०१६ रोजी व चालू सत्रात ४ जुलै २०१६ रोजी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. श्रीराम आश्रमशाळेत विद्यार्थिनींसाठी शौचालयांची व्यवस्था नाही तर मुलांना शौचासाठी दूर शेतात जावे लागते. ही शाळा शेती परिसरात असली तरी शाळेला सुरक्षा भिंत नाही.

यशोधरादेवी आश्रमशाळेत काही बाबी समाधानकारक आढळल्या. मात्र श्रीराम व ताराचंद नाईक आश्रमशाळेत सुविधांचा अभाव आहे. विद्यार्थी भामरागडसारख्या भागातील असल्याने त्यांची उपस्थिती कमी आढळली. या शाळा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आहेत की शाळा संचालकांचे पोट भरण्यासाठी हा प्रश्न उपस्थित होतो.
- अनेकश्वर मेश्राम, उपसभापती, पंचायत समिती, बल्लारपूर.

 

Web Title: Teacher absent, student wind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.