शिष्यवृत्ती परीक्षेतील सहभाग वाढविणासाठी शिक्षकांच्या सत्काराचा फंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:44 AM2020-12-15T04:44:15+5:302020-12-15T04:44:15+5:30
चंद्रपूर : राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन ...
चंद्रपूर : राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन या परीक्षेला अधिकाधिक विद्यार्थी बसावे तसेच जिल्ह्याचा टक्का वाढावा, यासाठी सीईओंसह शिक्षण विभागाने नवी शक्कल लढविली आहे. शिष्यवृत्तीसाठी अधिकाधिक विद्यार्थी बसण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन म्हणून शिक्षकांचा सत्कारही करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिक्षण समितीच्या बैठकीत तसा ठरावही झाला आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेकडे बघितले जाते. त्यामुळे या परीक्षेला जास्तीत जास्त विद्यार्थी बसावे, यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ राहुल कर्डिले यांनी स्वत: लक्ष घातले आहे. दरम्यान, त्यांनी शिक्षकांची सभा घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करणाच्या सूचनाही केल्या. शिक्षणाधिकारी प्राथमिक दीपेंद्र लोखंडे यांनीही शाळांना भेटी दिल्या. यंदाच्या निकालात जिल्ह्यातून १ हजार ३५४ प्राथमिक तर ३४२ माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी मारली. यावर्षी हा निकाल वाढविण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकही चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे धडे देणार आहे. मार्गदर्शक शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे, अन्य शिक्षकांनी प्रेरणा घेऊन एका शाळेतून आणि एका वर्गातून किमान ५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र व्हावे, हा हेतू पुढे ठेवून त्या शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. सोबतच नवोदय विद्यालय परीक्षेमध्ये शाळेतून दोन विद्यार्थी पात्र असतील त्या शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.
--
कोट
जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसावेत यासाठी शिक्षण विभागाने भर दिला आहे. दरम्यान, मार्गदर्शक शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा सत्कार करण्याचा ठराव शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
- रेखा कारेकर
शिक्षण समिती सभापती, जिल्हा परिषद चंद्रपूर.