बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी शिक्षकच अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:39 PM2018-07-16T23:39:53+5:302018-07-16T23:40:25+5:30

यंदा पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना बदललेल्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके देण्यात आली. या अभ्यासक्रमातील बदललेले घटक कोणते, अध्यापनाची पद्धत कशी असावी, याविषयी विद्या प्राधिकरणाने प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार केला होता.

The teacher is unaware of the changed curriculum | बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी शिक्षकच अनभिज्ञ

बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी शिक्षकच अनभिज्ञ

Next
ठळक मुद्देविद्या प्राधिकरणने गुंडाळले प्रशिक्षण : हस्त पुस्तिकेअभावी जि.प. शिक्षकांत संभ्रम

राजेश मडावी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : यंदा पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना बदललेल्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके देण्यात आली. या अभ्यासक्रमातील बदललेले घटक कोणते, अध्यापनाची पद्धत कशी असावी, याविषयी विद्या प्राधिकरणाने प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार केला होता. परंतु हे प्रशिक्षण मध्येच गुंडाळले. शिवाय जि. प. च्या शिक्षकांना हस्त पुस्तिकाच दिली नाही. त्यामुळे कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण हे तीन विषय शिकवितात मोठी त्रेधातिरिपट उडाली आहे. प्रशिक्षणाअभावी शिक्षकच अनभिज्ञ असल्याने विद्यार्थ्यांचे काय होणार, असा प्रश्न पालक विचारत आहेत.
विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र, बदलते भौगोलिक व वेगवान सामाजिक पर्यावरण आदी घटनांचा विचार करून यंदा इयत्ता पहिली आणि दहावीच्या अभ्यासक्रमात आमुलाग्र बदल करण्यात आला. पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून ज्ञान, माहिती आणि संस्काराची शिदोरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे असेल तर शिक्षक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी शिक्षकांची पूर्वतयारी करावी लागते. बदलेल्या अभ्यासक्रमातील सर्व शैक्षणिक संकल्पना, मानवी मूल्यभाव अध्यापनाद्वारे विद्यार्थ्यांच्या मनमेंदूत रूजविण्यासाठी प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले. याकरिता विद्या प्राधिकरणाने याकरिता परिषद शिक्षण विभागाला तयार करण्याचे सुचविले होते.
जिल्हा व तालुका पातळीवरील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर बदलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना कसा शिकवायचा यासंदर्भात तज्ज्ञांची नियुक्ती झाली. पण ऐनवेळेवर प्रशिक्षणाचा कार्यक्रम गुंडाळण्यात आला.
दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागानेही कानाडोळा करून पाठ्यपुस्तके शाळांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. पण, बदलेला अभ्यासक्रम शिकविताना अन्य विषयांची परस्परपुरकता व अध्यापनातील संभाव्य अडचणी याचा अजिबात विचार केला नाही, अशी खंत काही उपक्रमशील शिक्षकांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली. अभ्यासक्रम बदलवून विद्यार्थ्यांना नव्या युगाशी संवाद करीत आहोत, असा दावा करायचा हे दुटप्पी धोरण असल्याची टीका पालकांनीही केली आहे.

‘त्या’ तीन विषयांचे काय?
कोणत्याही पायाभूत अभ्यासक्रमात बदल करताना त्या वर्गातील अन्य पूरक विषयांची सांगड घातली जाते. मूळ विषय बदलविल्यानंतर कला, कार्यानुभव व शारीरिक अभ्यासक्रमाचीही पूनर्रचना होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ज्ञानात्मक पाया मजबूत करताना त्याच्या आवडीचे कला, ललित विषय, कार्यानुभव व शारीरिक शिक्षणाचे सामालिकरण करण्याची शिफ ारश शिक्षण तज्ज्ञांनी केली आहे. याकरिता शिक्षकांचे प्रशिक्षण अनिवार्य ठरते. मात्र, जि. प. शिक्षण विभागाने विद्या प्राधिकारणाकडे पाठपुरावा का केला नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नियोजनाविना अध्यापन
संपूर्ण अभ्यासक्रमाचे विविध घटकांवर आधारित संक्षिप्त स्वरूपात एकत्रिकरण करणाऱ्या पुस्तिकेला शिक्षक हस्त पुस्तिका म्हटले जाते. अध्यापन करणारे शिक्षक या पुस्तिकेच्या आधारावरच तासिकेनुसार अध्यापनाचे दैनंदिन नियोजन करतात. मात्र, जि. प. शिक्षकांना ही पुस्तिका अद्याप देण्यात आली नाही. त्यामुळे शाळा सुरू होवूनही दिवस ढकलण्याचे प्रकार घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना पहिल्या वर्गातील बदलेल्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके देण्यात आली आहेत. सभा सुरू असल्याने प्रशिक्षणासंदर्भात बोलता येणार नाही.
- प्रकाश लोखंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प.

Web Title: The teacher is unaware of the changed curriculum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.