विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरून शिक्षकांचे मूल्यमापन अयोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:21 AM2021-06-01T04:21:44+5:302021-06-01T04:21:44+5:30
चंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार शिक्षकांचे मूल्यमापन करण्याकरिता प्रशिक्षण देण्याचे नवीन धोरण शासन स्तरावरून अवलंबिलले जात आहे. त्यासाठी त्रयस्थ ...
चंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार शिक्षकांचे मूल्यमापन करण्याकरिता प्रशिक्षण देण्याचे नवीन धोरण शासन स्तरावरून अवलंबिलले जात आहे. त्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत विद्यार्थ्यांची चाचणी व परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरविली जाणार असल्याची शासनाची रणनीती आहे. शिक्षकांवर अन्याय करणाऱ्या या धोरणाविरुद्ध विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने विरोध केला आहे. हे धोरण मागे घ्यावे, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी केली असून यासंदर्भात राज्य शासनाला पत्र पाठविले आहे.
राज्यात भौगोलिक परिस्थिती सारखी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची तुलना होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार शिक्षकांचे वेतन निश्चित करणे शासनाचे धोरण शिक्षकांवर अन्याय करणारे असून शिक्षकांमध्ये दरी निर्माण करणारे आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीवरून शिक्षकांचे मूल्यमापन करून वेतन निश्चित करण्याचे धोरण ठरविणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांची योग्यता तपासून त्यांचे वेतन निश्चित करण्यात यावे, तसेच लोकप्रतिनिधींचे मूल्यांकन करून त्यांचे वेतन व भत्ते ठरविण्यात यावे, अन्यथा या धोरणाला संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक संघटनांकडून प्रखर विरोध केला जाईल, असा इशारा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी दिला आहे.