प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 11:37 PM2018-05-06T23:37:12+5:302018-05-06T23:37:12+5:30
राज्यातील खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळातर्फे चंद्रपूरचे प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांचा नेतृत्वात शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यातील खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळातर्फे चंद्रपूरचे प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांचा नेतृत्वात शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.
राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करावी, २३ आक्टोबर २०१७ चा जाचक शासन निर्णय रद्द करुन माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण तात्काळ सुरु करावे, सदर वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणासाठी १० वर्ष सेवा झालेल्या व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी २२ वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना पात्र ठरविण्यात यावे, अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी, मासिक वेतन एक तारखेस अदा करण्यात यावे, राज्यातील खासगी अंशत: व पूर्णत: अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मे २०१८ पासूनचे पुढील मासिक वेतन देयके मंजूर करण्यासाठी आदेशित करण्यात यावे, आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांना देण्यात आले. यावेळी सुधाकर अडबाले, जगदीश जुनगरी, केशव ठाकरे, श्रीहरी शेंडे उपस्थित होते.