अनाथाचे नाथ बनण्यास सरसावले शिक्षकांचे हात
By Admin | Published: January 13, 2017 12:32 AM2017-01-13T00:32:19+5:302017-01-13T00:32:19+5:30
हिरापूर येथील शिक्षकांनी अनाथ मुलीला दत्तक घेत तिला आर्थिक मदत केली व सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
निराधार मुलगी : शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
आवाळपूर : हिरापूर येथील शिक्षकांनी अनाथ मुलीला दत्तक घेत तिला आर्थिक मदत केली व सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
कोरपना तालुक्यातील हिरापूर जिल्हा परिषद शाळा आयएसओ नामांकण प्राप्त असून नुकताच राष्ट्रवादी आदर्श शिक्षक पुरस्कार येथील मुख्याध्यापक सुधाकर मडावी यांना प्राप्त झाला. त्यामुळे हिरापूर हे गावाला चंद्रपूर जिल्ह्यात व राज्यात नवी ओळख मिळाली आहे. त्यात सामाजिक कार्याची आणखी भर पाडत शिक्षकांनी एका अनाथ मुलीला दत्तक घेऊन तिच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे.
हिरापूर येथील मजूर शेतकरी उत्तम सिडाम यांच्या घरची परिस्थिती तशी बेताची. पण घरी कन्यारत्न (स्नेहा) आल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला. जन्मजात बाळकडू साहित्याने मुलगी हुशार होती. ती शिकू लागली. माध्यमिक शिक्षण घेत असताना दुर्गम आजाराने वडीलाचे निधन झाले आणि वडीलांचे छत्र हरपले. परंतु या परिस्थितीत न डगमगता अडचणींवर मात करीत तिने शिक्षण सुरु ठेवले. दहावीची परीक्षा तिने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. मात्र आर्थिक परिस्थिती हलाकीची असताना आजच्या महागाईच्या काळात शिक्षण कसे घ्यायचे, याचा तिला प्रश्न पडला आणि तिने मोल मजुरी करुन पोटाची खडगी भरण्यास सुरुवात केली. मात्र शिक्षणाचा ध्यास सुटला नव्हता. आर्थिक परिस्थितीने शिक्षण थांबणार अशी स्थिती होती. मात्र ही बाब हिरापूर येथील शिक्षकांना माहित होताच त्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी त्या मुलीला दत्तक घेवून तिच्या उर्वरीत शिक्षणाचा खर्च उचलण्याचे जाहीर केले आहे. सेवानिवृत्त शिक्षक वाघमारे यांनी सुद्धा त्या मुलीला कोणत्याही परिस्थितीत मदत करुन शिक्षण देण्याची जबाबदारी घेतली आहे. इतरांनीही अशाच निराधारांना आधार देण्याची गरज आहे. (वार्ताहर)