शिक्षकांना करावी लागतात अशैक्षणिक १०८ कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:20 AM2021-07-16T04:20:19+5:302021-07-16T04:20:19+5:30

चंद्रपूर : विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांची असते. मात्र मागील काही दिवसांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण ...

Teachers have to do 108 non-academic tasks | शिक्षकांना करावी लागतात अशैक्षणिक १०८ कामे

शिक्षकांना करावी लागतात अशैक्षणिक १०८ कामे

Next

चंद्रपूर : विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांची असते. मात्र मागील काही दिवसांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे. त्यातच जिल्हा परिषद शिक्षकांना विविध सामाजिक जबाबदाऱ्यांसह १०८ अशैक्षणिक कामे करावी लागतात. खिचडी शिजविण्यापासून मुलांना वाटप करण्यापर्यंतची कामे करावी लागत असल्यामुळे शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करून केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी त्यांच्यावर देणे गरजेचे आहे.

कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळांना सुटी आहे. या कालावधीमध्ये ऑनलाईन वर्ग घेतले जात आहेत. मात्र ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क तसेच इतर समस्या असल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर आहे. काही शिक्षक आपल्या परीने त्यांना शिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत; मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिक्षकांना विविध अशैक्षणिक कामांत गुंतवून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष शिकविण्यापेक्षा इतर कामांतच अधिक असते. अशा वेळी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा करणे चुकीचे ठरत आहे. विशेष म्हणजे, शिक्षकांना मोठ्या प्रमाणात वेतन दिले जाते. कोरोनाकाळात तर त्यांना कामच नाही, त्यांचे वेतन कमी करायला पाहिजे, अशा प्रकारचा समाजातील काही वर्गाचा सूर आहे. असे असले तरी अपवाद सोडला तर काही शिक्षक आपली जबाबदारी नेटाने पूर्ण करीत आहेत; मात्र अशैक्षणिक कामांमुळे तेही आता वैतागले आहेत; त्यामुळे मूळ उद्देशाला बगल दिली जात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

बाॅक्स

जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा - १५५७

एकूण शिक्षक - ५४८५

बाॅक्स

शिक्षकांची कामे

मतदार याद्या तयार करणे, जनगणना, पटनोंदणी, हत्तीपाय निर्मूलनासाठी सर्वेक्षण, वृक्षारोपण, शाळेची रंगरंगोटी, विद्यार्थ्यांचे बँक खाते, आधार कार्ड काढून देणे, पालकांची सभा, शाळा व्यवस्थापन समिती सभा, शाळेची ऑनलाईन माहिती भरणे, यू डायसवर माहिती भरणे, शैक्षणिक अहवाल तयार करणे, शिष्यवृत्तीबाबत माहिती भरणे, शिक्षण विभागाने मागितलेली माहिती पुरविणे, शालेय पोषण आहार वाटपाची कामे, पोषण आहारच्या नोंदी ठेवणे, धान्यसाठा नोंदविणे, धान्य, साहित्याची मागणी, शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे, विद्यार्थ्यांना धान्य वितरण करणे, प्रत्येक राष्ट्रीय कामात मदत करणे, सध्या कोरोनामुळे रस्त्यांवरही शिक्षकांना तपासणीसाठी कामावर लावण्यात आले होते.

बाॅक्स

खिचडी शिजवून घेणे; मुलांना वाटप करणे

सध्या शाळा बंद आहेत; मात्र त्या सुरू झाल्या की, शाळेमध्ये खिचडी शिजवून मुलांना वितरित करण्याचे कामही शिक्षकांनाच करावे लागते. याशिवाय अन्य कामेही आहेत.

बाॅक्स

शिक्षण सोडून इतर कामांसाठीच प्रत्येक शाळेत एक शिक्षक

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये क्लार्क नसतो. त्यामुळे प्रत्येक कामे शिक्षकांनाच करावी लागते. त्यातच आता शाळांसंदर्भात ऑनलाईन माहिती भरावी लागते. त्यामुळे शाळेतील एखाद्या शिक्षकाकडे ही सर्व कामे सोपविली जात आहेत; यामध्ये यू डायसवर माहिती भरणे, विद्यार्थ्यांचे बँक खाते, आधार कार्ड काढून देणे, शिक्षण विभागाने मागितलेली माहिती पुरविणे ही सर्व कामे त्या-त्या शाळेतील नेमून दिलेले शिक्षक करीत आहेत.

बाॅक्स

एकशिक्षकी शाळेचे हाल

ज्या शाळेमध्ये केवळ एक शिक्षक आहे, त्या शाळेमध्ये तर शिक्षकांचे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना सांभाळण्यापासून ते अशैक्षणिक कामे करताना त्यांच्या नाकीनऊ येत आहेत. एखाद्या दिवशी सुटी घेतली तरी शाळा बंद ठेवण्याची वेळ त्यांच्यावर येते.

कोट

शिक्षक संघटना म्हणतात,

शिक्षकांना अवांतर दिलेल्या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. सध्या कोरोना काळ असल्यामुळे ही कामे करणे शिक्षकांना शक्य आहे. मात्र इतर वेळी शैक्षणिक कामे सोडून अशैक्षणिक कामेच शिक्षकांना करावी लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे बहुतांश शिक्षकांचे दुर्लक्ष होते. अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची सुटका करणे गरजेचे आहे.

-जे. टी. पोटे

विभागीय अध्यक्ष

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक पती-पत्नी सेवा संघ

कोट

विविध अशैक्षणिक कामांमुळे शिक्षक वैतागले आहेत; यामुळे प्रत्यक्ष शिकविण्यासाठी वेळ कमी मिळतो. त्यामुळे शालेय पोषण आहार योजना देखरेख व नोंदी, दैनिक कागदोपत्री माहिती पुरविणे, अहवाल लेखन, ऑनलाईन माहिती भरणे, शाळा पोर्ट अशी १०८ प्रकारची अशैक्षणिक कामे शिक्षकांच्या मागे लावून ठेवली आहेत. ती कमी करावीत व या कामांसाठी प्रत्येक शाळेत लिपिक तथा शिपायांची नियुक्ती करावी.

- हरीश ससनकर

राज्य सरचिटणीस

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती

Web Title: Teachers have to do 108 non-academic tasks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.