गुरुजी; तुम्ही चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज केला का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 02:46 PM2024-10-03T14:46:35+5:302024-10-03T14:57:11+5:30

चारित्र्य प्रमाणपत्र अत्यावश्यक : प्रमाणपत्र नसेल तर नोकरी जाणार

Teachers Have you applied for character verification? | गुरुजी; तुम्ही चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज केला का ?

Teachers Have you applied for character verification?

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर :
बदलापूर येथील घटनेनंतर राज्यभरात मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकार समोर येत आहे. त्यामुळे शाळांमध्ये मुली, विद्यार्थी सुरक्षित आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने आता कठोर पाऊल उचलले असून शाळांमध्ये सीसीटीव्हींसह अन्य विविध बाबींवर लक्ष केंद्रीय केले आहे. विशेष म्हणजे, खासगी शाळांमध्ये नव्याने रुजू होण्यापूर्वी शिक्षक तसेच अन्य कर्मचाऱ्यांना आता पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेऊन ते शाळेत प्रथम जोडावे लागणार आहे. त्यानंतरच नोकरीत रुजू होता येणार आहे.


या सर्व घटना घडत असतानाच सोमवारी कोरपना येथे पुन्हा असेच प्रकरण उघडकीस आले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खासगी शाळांमध्ये शिक्षिक, मदतनीस, चालक, लिपिक तसेच अन्य कामे करण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची गरज असते. मात्र काही संस्थाचालक कर्मचाऱ्यांची कोणतीही पडताळणी न करता कामावर ठेवतात. आता मात्र पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेतल्याशिवाय नोकरीत सामावून घेताच येणार नसल्याचे शासनाने सूचनांसंदर्भात पत्रकच काढले आहे. अन्यथा संस्था चालकांवरही कारवाई होणार आहे. 


प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज कसा करणार?

  • आपले सरकार पोर्टल किंवा चारित्र्य पडताळणीच्या पोर्टलवर जाऊन अर्जदाराने नोंदणी करावी. नोंदणी करताना आपण ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो (शहरी किंवा ग्रामीण) त्याची निवड करावी. एकदा फॉर्म सबमिट केल्यास पुन्हा चूक दुरुस्त करता येत नाही. नोंदणीनंतर युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे.
  • चारित्र्य पडताळणी हा पर्याय निवडल्यानंतर दोन प्रकारचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळतील. 
  • फॉर्म भरताना वैयक्तिक माहिती, सध्याचा पत्ता व कायमचा पत्ता आणि चारित्र्य पडताळणी, आपण कुठे वास्तव्य केले आहे. किती काळ केले आहे त्याची माहिती भरावी लागते. आपल्यावर गुन्हा झाला असल्यास 'एस' किंवा नसल्यास 'नो' क्लीक करावे लागले.

 

पोलिस ठाण्यांत गर्दी 
जिल्ह्यातील विविध खासगी शाळा तसेच नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी यासाठी पोलिस स्टेशनमध्ये अर्ज सादर केला आहे विशेष म्हणजे, शासकीय नोकरीत रुजू होण्यापूर्वी प्रथम चारित्र्य प्रमा X जोडावे लागते. त्यामुळे सध्या पोलिस स्टेशनमध्ये प्रमाणपत्रांस करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.


शिक्षकांना चारित्र्य पडताळणी आवश्यक 
बदलापूर येथील घटनेनंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कठोर पाऊल उचलले आहे. यामध्ये शिक्षकांना चारित्र्य पडताळणी करावी लागणार आहे. विशेषतः खासगी शाळांमध्ये नवीन रुजू होण्याऱ्या शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना चारित्र्य प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात आले.


काय सांगते आकडेवारी? 
खासगी शाळांमध्ये नव्याने रुजू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना तर आता प्रमाणपत्र द्यावेच लागणार आहे. चंद्रपूर शहराचा विचार केल्यास सध्या काही प्रमाणात प्रमाणपत्रासाठी पोलिस स्टेशनमध्ये अर्ज करण्यात आले आहे.


शिक्षक संघटनेचे पदाधिकारी म्हणतात...
"मागील काही दिवसांमध्ये सातत्याने अशा घटना घडत आहे. या घटना एकूणच समाजासाठी धोकादायक आहे. यातून शाळा, शिक्षकांची प्रतिमा मलिन होत आहे. या घटनांवर आळा घालणे महत्त्वाचे आहे. काही अपप्रवृत्तीमुळे एकूणच शिक्षणक्षेत्र बदनाम होत आहे. त्यामुळे कठोर नियम करणे आवश्यक आहे."
- प्रकाश चुनारकर, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद


"शाळांमध्येच नाही तर एकूणच समाजातही अशा घटना घडणे धोक्याचे आहे. राज्यभरात काही शाळांमध्ये मागील काही दिवसांमध्ये अशा घटना सातत्याने घडत आहे. त्यामुळे मन विचलित होते. शिक्षणक्षेत्र अशा घटनांमुळे बदनाम होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिकाधिक नियम कठोर करणे आवश्यक आहे."
- जे. डी. पोटे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, चंद्रपूर

Web Title: Teachers Have you applied for character verification?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.