शिक्षकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून कार्य करणे गरजेचे!
By admin | Published: January 18, 2017 12:48 AM2017-01-18T00:48:36+5:302017-01-18T00:48:36+5:30
विद्यार्थ्यांना संस्कारक्षमत बनविण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य शिक्षकांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असते.
शोभाताई फडणवीस : मूल येथे शालेय क्रीडा स्पर्धा
मूल : विद्यार्थ्यांना संस्कारक्षमत बनविण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य शिक्षकांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असते. त्यामुळे शिक्षकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून कार्य केल्यास विद्यार्थ्यांच्या प्रगती शक्य आहे. शिक्षणाबरोबरच क्रीडा विषयक खेळाबाबतही प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थी घडविताना शिक्षणाबरोबरच क्रीडाची जोड द्यावी, असे प्रतिपादन माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी मूल येथील सुभाष प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, न.प.चे बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, पाणीपुरवठा सभापती मिलिंद खोब्रागडे, संस्थेचे सचिव माणिकराव जगताप, माजी प्राचार्य शशीकांत धर्माधिकारी, पत्रकार प्रा. चंद्रकांत मनियार, नगरसेवक अजय गोगुलवार, पं.स. मूलचे माजी उपसभापती अमोल चुदरी, माजी नगरसेविका लिना बद्देलवार, प्रशांत बोबाटे, मनीष येलट्टीवार, सुनील गायधने, जयंत मोरांडे, विलास अलगमवार, अशोक मेश्राम, मुख्याध्यापक अविनाश जगताप, पत्रकार रमेश माहुरपवार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेतील स्काऊट अॅड गाईडच्या विद्यार्थ्यांतर्फे पाहुण्यांना सलामी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. स्वागत गीताबरोबरच विविध नृत्याचे उपस्थितांचे मने वेधून घेतली. अध्यक्षस्थानावरुन नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी शालेय विद्यार्थ्यांना विविध छोट्या-छोट्या कथा सांगून उद्बोधन केले. माजी प्राचार्य धर्माधिकारी व पत्रकार चंद्रकांत मनियार यांनी विविध उदाहरणातून विद्यार्थ्यांना बौद्धीक मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप यांनी शाळेत राबवित असलेल विविध उपक्रमाची माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या बौद्धीक ज्ञानाला चालना देण्यासाठी शाळा अविरत प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन शाळेचे सहायक शिक्षक बंडू अल्लीवार तर उपस्थितांचे आभार सहायक शिक्षिका रीना मसराम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे पदविधर शिक्षक राजू गेडाम, सहायक शिक्षक राहुल मुंगमोडे, योगेश पुल्लकवार, अंजली जगताप, अजय राऊत, सर्व पालक व नागरिकांनी विशेष सहकार्य देऊन परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)