जिवतीतील शाळांना शिक्षकांचे ‘नो लाईक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:21 AM2018-06-29T00:21:13+5:302018-06-29T00:21:40+5:30
अनेक वर्षानंतर यावर्षी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन प्रक्रियेद्वारे पार पडल्या. मात्र या आॅनलाईन प्रक्रियेत बदलीचा अर्ज भरताना जिल्ह्यातील एकाही शिक्षकाने जिवती तालुक्यातील नऊ शाळांना पसंती दर्शविली नाही.
संघरक्षित तावाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : अनेक वर्षानंतर यावर्षी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन प्रक्रियेद्वारे पार पडल्या. मात्र या आॅनलाईन प्रक्रियेत बदलीचा अर्ज भरताना जिल्ह्यातील एकाही शिक्षकाने जिवती तालुक्यातील नऊ शाळांना पसंती दर्शविली नाही. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस असतानाही येथील शाळांमध्ये शिक्षक रुजूच झाले नाहीत. पर्यायी व्यवस्था म्हणून शिक्षण विभागाने जवळच्या शाळेतील शिक्षकांना त्या शाळेत प्रतिनियुक्ती देऊन शाळा उघडल्याचा प्रकार शाळेच्या पहिल्या दिवशी घडला.
जिवती तालुक्यात काही शासकीय नोकरदार सेवा करण्यात नाखूश आहेत, याची प्रचिती यावरुन दिसून येते. शिक्षकांच्या यावर्षीच्या बदली प्रक्रियेत जिवती तालुक्यातून २४६ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यांच्या जागी जवळपास २१५ शिक्षक रुजू झाले. यात ३१ शिक्षकांची आणखी आवश्यकता आहे. मागील वर्षी विषय शिक्षकांच्या बदल्यात जिवतीवरुन विषय शिक्षक बदली झालेत. परंतु, दुसरे विषय शिक्षक अजूनही सुरू झालेले नाहीत. केवळ १० विषय शिक्षक रुजू झाले असून आजही ५० विषय शिक्षकांचा अनुशेष आहे. शिक्षकांची बदली प्रक्रिया ही आॅनलाईन राबविण्यात आली. मात्र जिवती तालुक्यातील येरव्हा, राहपल्ली (बु.) पळसगुडा, पाटागुडा, महाराजगुडा, कोलामगुडा, शेडवाही, टाटाकोहाळ, भुरी येसापूर येथील शाळांना पसंती दिली नाही. २६ जूनला शाळेच्या पहिल्या दिवशी या शाळात प्रतीनियुक्तीवर जवळच्या शाळेतील शिक्षक पाठविण्यात आले.
तालुक्यातील अनेक शाळेत चार ते पाच शिक्षकांची आवश्यकता असताना, त्या शाळेत केवळ एकच शिक्षक विद्यादानाचे कार्य करत आहेत. तर ‘त्या’ नऊ शाळांमध्ये शिक्षकच रुजू झाले नाही तर शाळाच बंद करण्याची वेळ तर येणार नाही ना, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
रुजू झाले आणि वैद्यकीय रजेवर गेले
बदली प्रक्रियेनंतर तालुक्यात अनेक शाळांत शिक्षक रुजू झालेत. परंतु, आल्याआल्याच वैद्यकीय रजा घेऊन निघून गेलेत. वैद्यकीय रजा घेऊन अनेकांनी काढता पाय घेतल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची चिन्हे आहेत. शिक्षण विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
मोठ्या शाळा ओस
तालुक्यात शिक्षक रुजू न झाल्यामुळे तसेच रुजू झालेले शिक्षक वैद्यकीय रजेवर गेल्यामुळे मोठ्या जि. प. शाळा ओस पडल्या आहेत. कुंबेझरी येथील डिजिटल शाळा, सेवादासनगर, येल्लापूर या मोठ्या शाळांत शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थीही येत नाही.