शिक्षक म्हणतात, ‘काळ्या मुलांना शिकवूशा नाही लागत!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 11:26 AM2023-02-02T11:26:19+5:302023-02-02T11:26:50+5:30
शिक्षण विभागात खळबळ : सोशल मीडियावर विद्यार्थ्यांच्या ‘मनोगता’चा व्हिडीओ व्हायरल
रवी रणदिने
ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : ‘काळ्या मुलांना शिकवूशा नाही लागत’, तुम्ही शाळेत फक्त खावाले येता’ या शब्दात शिक्षक, शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत बोलतात. ज्या वयात विद्यार्थ्यांना शिक्षकांकडूनशिक्षण व संस्काराचे बाळकडू हवे, तिथे गोरगरीब विद्यार्थ्यांना अशा शब्दात बोलून वारंवार अपमानित केले जात आहे. या प्रकाराचा व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि चर्चेचा विषयही झाला आहे.
तालुक्यातील कोसंबी (खडसमारा) येथील जि. प. उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांच्या विरोधात एकत्र येत गावात मोर्चासदृश आंदोलनच केले. शिक्षक कसे वागणूक देतात, त्याबाबत त्यांनी अनेकांना एकत्र येत माहिती दिली. त्यांच्याकडून शिक्षकांच्या वागणुकीची माहिती दिल्यानंतर धक्काच बसला. एका जणाने विद्यार्थ्यांच्या मनोगताचा एक व्हिडीओच तयार करून व्हायरल केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून ग्रामीण भागात शिक्षणाचा काय खेळखंडोबा सुरू आहे, याचा प्रत्यय देणारा ठरत आहे.
कोसंबी (खडसमारा) या गावात जि. प. उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक वेळेवर शाळेत येत नाही. विद्यार्थ्यांना सकाळी १०.३० वाजता शाळेत बोलावून स्वत: दुपारी २ वाजता येतात. अभ्यासक्रम पूर्ण करत नाही, त्यामुळे अशा शिक्षकांची बदली करण्यात यावी व अतिरिक्त दोन शिक्षक देण्यात यावे या मागणीसाठी शाळेतील चिमुकल्यांनी शाळेत न जाता गावात एकत्र येत मोर्चा काढला. एक शिक्षक वगळता अन्य शिक्षकांच्या विरोधात एल्गार पुकारला. त्याच वेळेस एकाने विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या समस्या आपल्या मोबाइलमध्ये घेत त्याची चित्रफीत तयार केली व ती समाजमाध्यमावर व्हायरल केल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
संबंधित प्रकरणावर गटशिक्षणाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी केल्यानंतर कारवाई करण्यात येईल.
- संजय पुरी, गटविकास अधिकारी पंचायत समिती ब्रह्मपुरी