शिक्षकांच्या बदल्यांवर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 07:24 PM2020-04-21T19:24:33+5:302020-04-21T19:24:58+5:30
जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात शासनाने अभ्यासगटाची नियुक्ती केली होेती. दरम्यान, एक महिन्यापूर्वीच या अभ्यास गटाने शासनाकडे अहवाल सादर केला. त्यामुळे शिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या असतानाच कोरोनाच्या सावटामुळे शासन शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात कार्य निर्णय घेते याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात शासनाने अभ्यासगटाची नियुक्ती केली होेती. दरम्यान, एक महिन्यापूर्वीच या अभ्यास गटाने शासनाकडे अहवाल सादर केला. त्यामुळे शिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या असतानाच कोरोनाच्या सावटामुळे शासन शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात कार्य निर्णय घेते याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीसंदर्भात दरवर्षी मोठा गोंधळ होतो. या बदल्यांमध्ये एकसुत्रता यावी, कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होऊ नये यासाठी काही वर्षांपूर्वी शिक्षकांची बदली ऑनलाईन करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले होते. या धोरणानुसार शिक्षकांच्या बदल्या केल्या जात होत्या. ऑनलाईन बदलीमुळे शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच राजकीय हस्तक्षेपावरही काही प्रमाणात हा होईना, आळा बसला. मात्र या धोरणामध्येही काही त्रुटी असल्याचे नव्या सरकारच्या लक्षात येताच या बदल्यांमध्ये अधिकाधिक पारदर्शकता यावी यासाठी राज्यस्तरीय शिक्षण बदली धोरण ठरविण्यासाठी एका अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये अध्यक्ष म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,सचिवपदी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, सदस्य म्हणून नंदूरबार जिल्हा परिषदेचे सीईओ विनय गौडा, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सीईओ राहूल कर्डिले, उस्मानाबाद जिल्हा परिषदचे सीईओ डॉ. संजय कोलते यांचा समावेश होता. या अभ्यासगटाने आपल्या निर्धारित वेळेत शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, अप्पर मुख्य सचिव अरविंद कुमार यांच्याकडे अहवाल सादर केला. हा अहवाल सादर केल्यानंतर शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच देशात आलेल्या कोरोनाच्या थैमानामुळे शासकीय स्तरावर हा अहवाल आता मागे पडला असून सर्व प्रशासकीय यंत्रणा या कामामध्ये गुंतली आहे. त्यामुळे यावर्षी शिक्षकांची बदली होण्याची शक्यता आतातरी मावळली आहे.
शासननिर्णयाप्रमाणे शिक्षक पती-पत्नींना एकत्रिक बदली करून एकत्र आणण्यात आले होते. मात्र मागील वर्षी यातील काही बदलीपात्र झाल्याने दुसरीकडे बदली करण्यात आली. त्यामुळे पुन्हा पती-पत्नी दुरावले. विशेष म्हणजे, पती-पत्नी यापैकी दोघांच्या शाळेचे अंतर ३० कि..मी. पेक्षा अधिक नसावे, असा नियम असतानाही मागील वर्षी दूरवर बदली झाल्याने शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे नव्या अहवालानुसार यावर्षी बदली होऊन किमान आपण एकत्र येऊ, अशी अपेक्षा या शिक्षकांना होती. मात्र कोरोनामुळे ती यावर्षी तरी पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.