टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना सेवा संरक्षण हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:43 AM2021-02-23T04:43:05+5:302021-02-23T04:43:05+5:30
चिमूर : टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावे तसेच सेवासमाप्तीचे आदेश त्वरित थांबविण्यात यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा ...
चिमूर : टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावे तसेच सेवासमाप्तीचे आदेश त्वरित थांबविण्यात यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा शिक्षक भारती संघटनेतर्फे शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केले आहे.
टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना तीन संधी देण्यात आल्या होत्या. परंतु, टीईटी परीक्षा २०१८ नंतर झाली नाही. संबंधित शिक्षकांना केवळ एकच संधी प्राप्त झाली आहे. अशा सर्व शिक्षकांना तीन संधी देण्यात याव्यात, अल्पसंख्यांक संस्थांच्या शाळांसाठी टीईटी बंधनकारक असल्याचा शासन निर्णय २०१८ मध्ये जाहीर करण्यात आला. निर्णयाच्या तब्बल १८ महिन्यानंतर शासनामार्फत टीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले. तोपर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत शासनाने दिलेली मुदत संपली होती. शासनाच्या या धोरणामुळे तांत्रिक समस्या निर्माण झाल्या. अनुत्तीर्ण शिक्षकांना केवळ एकच संधी प्राप्त झाली आहे. तसेच जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण झाले. परंतु, निकाल ३० मार्च २०१९ नंतर लागला, अशा शिक्षकांवर अन्याय होत आहे. सेवासमाप्तीचे निर्णय घेण्याबाबतचा शासन निर्णय अन्यायकारक असून संबंधित शिक्षकांच्या सेवेत सेवासातत्य ठेवण्यात यावे, सेवा संरक्षण द्यावे याकडे निवेदनातून लक्ष वेधले. यावेळी शिक्षक भरती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर बावनकर, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम टोंगे, जिल्हा कार्यवाह राकेश पायतोडे, सुरेश मडावी, मनोहर राठोड आदी उपस्थित होते.