केंद्रप्रमुख होण्याच्या एकमेव संधीतही शिक्षक राहणार वंचित
By साईनाथ कुचनकार | Published: June 15, 2023 04:26 PM2023-06-15T16:26:24+5:302023-06-15T16:27:12+5:30
केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी उपलब्ध होत असलेल्या या एकमेव संधीमधील अटीमुळे ते या पदापासून वंचित राहणार आहेत.
चंद्रपूर : केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३ साठी कार्यरत प्राथमिक शिक्षकांसाठी वयमर्यादा व अन्य अटी लादण्यात आल्या आहे. यामुळे केंद्रप्रमुख होण्याच्या एकमेव संधीतही प्राथमिक शिक्षकांना वंचित रहावे लागणार आहे. या अटी कमी कराव्यात, यासाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने राज्य शासनाला निवेदन दिले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी ५ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार केंद्रप्रमुखपदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. यातील काही अटींमुळे कार्यरत प्राथमिक शिक्षकांवर अन्याय होणार आहे. प्राथमिक शिक्षकांना सेवेत असताना पदोन्नतीच्या अतिशय अल्प संधी उपलब्ध आहेत. सेवेत असताना शैक्षणिक पात्रता वाढवूनदेखील त्यांना पदोन्नतीची संधी मिळत नाही. केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी उपलब्ध होत असलेल्या या एकमेव संधीमधील अटीमुळे ते या पदापासून वंचित राहणार आहेत.
या परीक्षा आयोजनात सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी ५० वर्ष वयोमर्यादा ठेवलेली आहे. ती रद्द करण्यात यावी. पदवीला ५० टक्के गुणांची अट कमी करण्यात यावी. अर्ज भरताना पदवी कधी प्राप्त केली याबाबत अट नसावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यासाठी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शालेय आयुक्तांना राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर यांच्या स्वाक्षरीने निवेदन पाठविण्यात आले आहे.