विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांची फरफट
By admin | Published: November 27, 2014 11:33 PM2014-11-27T23:33:07+5:302014-11-27T23:33:07+5:30
विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची ग्रामीण भागात आजही फरफट सुरूच आहे. दहा वर्षांचा काळ लोटूनसुद्धा सानुग्रह अनुदान किंवा पगारही त्यांच्या पदरात नाही.
देवाडा (खुर्द) : विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची ग्रामीण भागात आजही फरफट सुरूच आहे. दहा वर्षांचा काळ लोटूनसुद्धा सानुग्रह अनुदान किंवा पगारही त्यांच्या पदरात नाही. या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नोकरी व्यतिरिक्त फावल्या वेळेत इतरत्र कामे करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे.
पोंभूर्णा तालुक्यात एकूण १२ शाळा असून यात नऊ शाळा अनुदानित तर तीन विनाअनुदानित आहेत. ग्रामीण भागात प्रत्येकाला शिक्षण मिळावे. यासाठी शासनाने विनाअनुदान तत्वावर मोठ्या प्रमाणात शाळांना मान्यता दिली. आजतागायत १० वर्षे उलटली. त्यांचे अनेक विद्यार्थी मोठ्या हुद्यावर पोहोचली. २० ते २५ हजार रुपये मासिक वेतन मिळवित असल्याचे ते आजही गावात आल्यावर शिक्षकांना अभिमानाने सांगतात. मात्र विना अनुदानित शाळांमधील शिक्षक अद्यापही आर्थिक विंवचनेतून बाहेर पडले नाही. कुणी सकाळी गावात पानटपरी व इतर व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, असे भीषण वास्तव्य त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे. शाळेला आज ना उद्या अनुदान मिळणार, या आशेवर त्यांचे जगणे सुरू आहे. शासनाने २००९ मध्ये ‘कायम’ शब्द काढून टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याची घोषणा केली. परंतु २०१४ वर्ष संपायला आले तरी शिक्षण विभागाच्या टोलवा-टोलवी धोरणामुळे कुठलेच अनुदान शाळापर्यंत पोहचू शकले नाही. परिणामी जिल्ह्यातील कित्येक शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी वेठबिगार झाले आहेत.
पूर्वी खेड्यापाड्यात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी होते. मात्र ग्रामीण भागात लहान-मोठ्या खेडेगावामध्ये विनाअनुदानित शाळा सुरू झाल्याने प्रत्येक गावांत शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. १० वर्षांपासून कायम नोकरीत संधी मिळेल, या अपेक्षेने काम करणाऱ्या शिक्षकांना वेळेत पगार मिळत नसल्याने संसाराला हातभार लावण्यासाठी पहाटे उठून गावात इतरत्र मिळेल ते काम करावे लागत आहे.
ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण देऊन घडविले ते कमवतेही झाले. परंतु आजही विनाअनुदान शाळेला अनुदान मिळाले नाही. केवळ तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत असल्याने त्यांची ही होणारी फरफट केव्हा थांबणार असे अन्यायग्रस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून बोलले जात आहे. (वार्ताहर)