भगवान बुद्धांची शिकवण हाच खरा जीवनमार्ग - हंसराज अहीर
By admin | Published: January 31, 2016 01:01 AM2016-01-31T01:01:48+5:302016-01-31T01:01:48+5:30
भगवान गौतम बुद्ध आम्हा भारतीयांसाठी श्रद्धेचे स्थान असून त्यांनी समता, बंधूता, मैत्री हा जगाला दिलेला संदेश आहे.
चंद्रपूर : भगवान गौतम बुद्ध आम्हा भारतीयांसाठी श्रद्धेचे स्थान असून त्यांनी समता, बंधूता, मैत्री हा जगाला दिलेला संदेश आहे. त्याची जगाला गरज आहे. बुद्धांची शिकवण हाच खरा जीवनमार्ग आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
बुद्धीस्ट समन्वय कृती समिती, मूल रोड, चंद्रपूर येथे आयोजित बौद्ध उपवर-वधू परिचय मेळावा व तीन दिवसीय बौद्ध धम्म परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या परिचय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष हरिश सहारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जीवन नारनवरे, दिलीप वावरे, अजय गणवीर, विलास बनकर, सचिव अॅड. अवधूत मांगे, विद्याधर लाडे, रमेशचंद्र राऊत, दीपक टेंभूर्णे यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी ना. अहीर पुढे म्हणाले, मानव गरीबी, जातीधर्म पंथ पाहून जन्माला येत नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अडीच हजार वर्षापूर्वीचा असलेल्या बौद्ध धर्माचा स्वीकार करून आपल्यावर फार मोठे उपकार केले आहेत.
वधू-वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून समाजसेवा घडविली जाते. गरीब मुला-मुलींच्या पालकांना यातून आर्थिक भूर्दंडापासून वाचविले जात असून सामाजिक भावना जागृत करण्यासाठी असे मेळावे आयोजित करण्याचे त्यांनी आवाहन केले. समाज बांधवांनी तथागत बुद्धांच्या प्रज्ञा, शिल, करुणा, मैत्री या चर्तु:सुत्रीचा व अष्टांगिक मार्गाचा स्विकार व शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धाच्या वैज्ञानिक तत्वाचा स्विकार करून अष्टशिलाचे पालन करावे. त्यातच खरा जीवनमार्ग आहे. युवकांनी बेरोजगारीवर स्वयंरोजगाराच्या माध्यमातून मात करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. अशा प्रकारच्या कार्यक्रमातून सामाजिक सहिष्णूता अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याने अशा प्रकारचे परिचय मेळावे आयोजित करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गत दशकभरापासून बुद्धीस्ट समन्वय कृती समिती, चंद्रपूरच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असून सामाजिक सौहार्द्र बळकट होत असल्याचे सांगितले. अशा कार्यक्रमांना त्यांनी शुभेच्छा प्रदान करतानाच भगवान बुद्धाच्या व डॉ. बाबासाहेबांच्या विचाराने शिक्षण घेवून नवसमाज घडविण्यासाठी बराक ओबामांसारख्यांनीे उच्चपदस्थ होण्याचा मान मिळविला. त्यांनी तथागतांच्या विचारांना शरण जावून बौद्ध धम्माचा स्विकार केल्याचीे यावेळी आठवण करून दिली. या मेळाव्याला सहभागी उपासकांनी धम्म परिषदेच्या माध्यमातून विचार मंथन करून त्यांचे विचार आत्मसात करून ते आचरणात आणण्याचे आवाहन केले. यावेळी पाहुण्यांनी समयोचित विचार मांडले. प्रास्ताविक सचिव अॅड. मांगे, संचालन प्रविण नेल्लुरी, अजय गणवीर यांनी केले तर आभार अशोक निमसरकार यांनी मानले. यशस्वीतेसाठी समाजबांधवांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)