अयोध्यातील राममंदिराला बल्लारपूरच्या सागवानाची झळाळी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 12:29 PM2023-03-23T12:29:27+5:302023-03-23T12:32:33+5:30
१८०० क्युबिक मीटर लाकूड पाठविणार : वनविभागाच्या डेपोतून निघणार शोभायात्रा
चंद्रपूर : अयोध्या येथील नवनिर्मित राममंदिरासाठी बल्लारपूर येथील वनविभागाच्या डेपोतून १ हजार ८०० क्युबिक मीटर सागवान लाकूड पाठविण्यात येणार आहे. या डेपोतून २९ मार्च रोजी भव्य शोभायात्रा निघेल. शोभायात्रेत उत्तर प्रदेश सरकारचे तीन कॅबिनेट मंत्री व अयोध्या राममंदिरातील पुजारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
भाजप महानगर व ग्रामीणच्या वतीने बुधवारी गांधी चौकात गुढीपूजन व एक कोटी रामनाम जप पुस्तिका वितरणाप्रसंगी ते बोलत होते.
रामनाम जपाच्या पुस्तिका अयोध्या येथील नवनिर्मित राममंदिरासाठी मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर येथून पाठविण्यात येणाऱ्या काष्ठ (सागवान) पूजनप्रसंगी २९ मार्चला प्रभू श्रीरामाला समर्पित केल्या जातील. यापूर्वी चंद्रपूरकरांनी मोठ्या प्रमाणात अयोध्या मंदिरासाठी रामशिळा पाठविल्या होत्या. २९ मार्च रोजी सागवान लाकडाची मिरवणूक बल्लारपूर येथील वनविभाग डेपोतून चंद्रपुरात दाखल होईल. सायंकाळी चांदा क्लब ग्राउंड येथे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या भक्तिसंगीताचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.