अतिपावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत साचले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:31 AM2021-09-23T04:31:15+5:302021-09-23T04:31:15+5:30
शंकरपूर : निसर्ग कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ करीत आहे, हे समजून येत नाही. सतत येत असलेल्या पावसामुळे ...
शंकरपूर : निसर्ग कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ करीत आहे, हे समजून येत नाही. सतत येत असलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकातून अंकूर यायला लागल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आता पाणी येत आहे.
शंकरपूर परिसरातील खैरी, साठगाव, कोलारी, हिवरा, अंबोली, चिंचाळा, आजगाव, पाचगाव आदी गावांत मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत. निसर्गाने सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात साथ दिल्याने आणि सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी या वेळेस सोयाबीन पीक घेतलेले आहे. आता सोयाबीन पीक संपूर्णपणे वाळलेले असून आता ते कापणीवर आलेले आहे. परंतु मागील पंधरा दिवसांपासून सतत पाऊस येत असल्याने उभ्या सोयाबीन पिकामधूनच अंकुर फुटायला लागल्याने उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.
बॉक्स
यंदा सोयाबीनचा पेराही वाढला
कृषी कार्यालय शंकरपूर अंतर्गत सन २०२० मध्ये १२६५ हेक्टर जमिनीवर सोयाबीन पिकांची लागवड करण्यात आली होती. यात वाढ होऊन या वर्षीच्या हंगामात १४७८ हेक्टरमध्ये सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली. आता हे सर्व पीक कापणीला आले आहे. परंतु मागील १५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने सोयाबीन पिकांची कापणी करण्यात आली नाही. त्यामुळे या पिकातून कोंब यायला लागले आहेत तर काही सोयाबीन पीक काळे पडत आहे. त्यामुळे या पिकाला पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून पाणी येत आहे.